मुंबई – ‘महाकुंभ व्हायरल गर्ल’ म्हणून प्रसिद्ध झालेली मोनालिसा भोसले पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आली आहे. अलीकडेच तिने केरळमध्ये तिचा प्रियकर फहमान खान याच्यासोबत हिंदू पद्धतीने विवाह केला. या आंतरधर्मीय लग्नामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली असून, काही ठिकाणी या विवाहावर टीकाही होत आहे.
दरम्यान, कोची येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोनालिसाने धक्कादायक आरोप करत चित्रपटसृष्टीत खळबळ उडवली. तिने दिग्दर्शक मनोज मिश्रा यांच्यावर अयोग्य वर्तन केल्याचा गंभीर आरोप केला आहे. चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने त्यांनी वारंवार अयोग्य स्पर्श केल्याचा दावा मोनालिसाने केला. “मी काय सहन केलं आहे, हे फक्त मलाच माहिती आहे,” असे सांगताना ती भावुक झाली.
मोनालिसाच्या म्हणण्यानुसार, हा प्रकार तिने कुटुंबीयांना सांगितला होता; मात्र त्यांच्याकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. त्यामुळे ती एकटी पडल्याची भावना तिने व्यक्त केली. पुढे बोलताना तिने असा आरोपही केला की, संबंधित दिग्दर्शक तरुणींना कामाचे आमिष दाखवून त्यांचे शोषण करतात.

पोलिसांत तक्रार का दाखल केली नाही, याबाबत स्पष्टीकरण देताना मोनालिसा म्हणाली की, तिने तक्रार करण्याचा विचार केला होता; मात्र कुटुंबीयांच्या दबावामुळे ती मागे हटली. आता मात्र तिने सरकारकडे मदतीची मागणी केली आहे.
याचबरोबर, लग्नानंतर तिला आणि तिच्या पतीला सतत धमक्या मिळत असल्याचा दावा देखील तिने केला. तसेच, तिच्या पतीला दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप तिने फेटाळून लावला आहे.
या सर्व घडामोडींमुळे सोशल मीडिया आणि चित्रपटसृष्टीत मोठी खळबळ उडाली असून, प्रकरणाची चौकशी होण्याची मागणी जोर धरत आहे.










