केडगाव येथील धक्कादायक प्रकार
अहिल्यानगर:
कामावरून सोडलेल्या एका हॉटेल कर्मचाऱ्याला आपल्या खोलीत राहू दिल्याच्या कारणावरून हॉटेल मालकाने मॅनेजर आणि त्या कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना केडगाव येथे घडली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुभाष सुकारामजी पांगा (वय 41) हे केडगाव येथील अर्चना हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात. त्यांच्याच ओळखीचा आलमगीर मंडल हा तरुण जवळच्याच जय मल्हार हॉटेलमध्ये काम करत होता. मालकाने पगार न दिल्यामुळे काम सोडून गावाकडे जाण्यासाठी आलमगीर हा 21 मे रोजी रात्री अर्चना हॉटेल येथे आला होता. मॅनेजर सुभाष पांगा यांनी त्याला रात्री आपल्या खोलीत राहू दिले.
22 मे रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास जय मल्हार हॉटेलचा मालक विशाल बाळासाहेब राहिंज हा त्या खोलीवर आला. त्याने दरवाजा वाजवून आत प्रवेश केला आणि तू त्याला इथे राहिला जागा कशी काय दिली? असा जाब विचारला. त्यानंतर विशाल राहिंज याने मॅनेजर सुभाष पांगा यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
एवढ्यावरच न थांबता आरोपीने आलमगीर मंडल याला खोलीच्या बाहेर ओढून काढले आणि त्यालाही बेदम मारले. जर तू परत इथे दिसलास तर तुझे हात-पाय तोडून टाकीन, अशी जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपी तेथून निघून गेला.या घटनेनंतर घाबरलेल्या मॅनेजरने आपल्या मित्रासह कोतवाली पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी विशाल बाळासाहेब राहिंज (रा. वॉटरगल्ली, केडगाव, अहिल्यानगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार लगड करत आहेत.










