संगमनेर | नगर सह्याद्री
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल ९५० किलो गोमांस जप्त केले आहे. या प्रकरणी पोलीसांनी कत्तलखान्यावर छापा टाकत मोठा मुद्देमाल हस्तगत केला असून संबंधित आरोपी फरार झाले आहेत.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात गोवंशीय जनावरांच्या अवैध कत्तलीवर कारवाई सुरू आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते.
गुप्त माहितीवरून दिनांक १३ एप्रिल रोजी संगमनेरमधील जमजम कॉलनी (गल्ली नं. ०६) येथे पत्र्याच्या शेडमध्ये अवैध कत्तल सुरू असल्याची माहिती मिळताच पथकाने तात्काळ छापा टाकला. मात्र, पोलीसांची चाहूल लागताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. नवाज जावेद कुरेशी, समद जावेदशी, नावेद जावेद कुरेशी (सर्व रा. भारतनगर, संगमनेर) हे पसार झाले.
सदर ठिकाणावरुन ९५० किलो गोमांस, चाकू, काणस व वजन काटा असा एकूण २ लाख ८७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ व प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेने गेल्या आठवड्यात अशा ४ कारवाया करत एकूण २० लाख ७१ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडक कारवाईमुळे संगमनेर परिसरात खळबळ उडाली असून अवैध कत्तल करणार्यांवर पोलिसांचा मोठा दबाव निर्माण झाला आहे.










