- जाहिरात -spot_img
breaking news

तमिळनाडूमध्ये काँग्रेसने डाव टाकला! काय घडलं पहा…

तमिळनाडू / वृत्तसंस्था –
तमिळनाडूमध्ये सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असून काँग्रेसने विजय जोसेफच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाला जाहीर पाठिंबा दिला आहे. तत्पूर्वी त्यांनी द्रमुक पक्षाबरोबर असलेली पाच दशकांपासूनची आघाडी मोडली असल्याची घोषणा केली. काँग्रेस पक्षाने एक प्रसिद्धीपत्रक काढले असून यात आघाडी का मोडत आहे? याची कारणे दिली आहेत. संविधानाला न मानणाऱ्या जातीयवादी पक्षांना टीव्हीके दूर ठेवेल, या अटीवर आपण पाठिंबा देत आहोत, असे काँग्रेसने म्हटले आहे.

तमिळनाडूमधील २३४ जागांसाठी ९ एप्रिल रोजी मतदान पार पडले. ४ मे रोजी लागलेल्या निकालात विजय जोसेफच्या पक्षाला सर्वाधिक १०८ जागा मिळाल्या. मात्र बहुमतासाठी लागणाऱ्या ११८ जागांचा टप्पा गाठण्यासाठी त्यांना १० आमदारांची आवश्यकता होती. काँग्रेसचे ५ आमदार निवडून आले आहेत. तसेच सीपीआय आणि सीपीआयएम या डाव्या पक्षांचे चार आमदार निवडून आले आहेत. याशिवाय इतर लहान पक्षांना बरोबर घेऊन टीव्हीकेने सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले, “‘तमिळगा वेत्री कळघम’ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष थिरू सी विजय यांनी तमिळनाडूमधील सत्तास्थापनेसाठी अधिकृतरित्या प्रस्ताव दिला होता. तमिळनाडूमधील जनतेने आणि विशेषतः तरूणांनी धर्मनिरपेक्ष, प्रगतीशील आणि घटनात्मक तत्त्वावर विश्वास असलेल्या पक्षाला साथ दिली आहे. त्यांनी ‘तमिळगा वेत्री कळघम’पक्षाच्या विजयला पुढील सरकार स्थापन होण्यासाठी स्पष्ट जनमत दिले आहे.”

डीएमकेशी आघाडी मोडल्याचे अधिकृत पत्र काँग्रेसने प्रसिद्ध केले आहे.
संविधानावर ज्यांचा विश्वास नाही अशा जातीयवादी पक्षांना या आघाडीत घेऊ नका, अशी अट काँग्रेसने ठेवली आहे. “काँग्रेस आणि टीव्हीके यांची ही आघाडी पेरुंथलायवर कामराज यांच्याकाळातील संपन्नता आणण्यासाठी प्रयत्न करेल. हे करत असताना पेरियार यांचे विचार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनात्मक आदर्शांना डोळ्यासमोर ठेवले जाईल”, असेही या पत्रात म्हटले आहे.

भविष्यातही टीव्हीकेबरोबर आघाडी कायम राहणार?
टीव्हीकेबरोबरची आघाडी भविष्यातही कायम ठेवणार असल्याचा विचार काँग्रेसने पत्रात व्यक्त केला आहे. “फक्त हे सरकार स्थापन करण्यापुरतेच नाही तर आगामी काळातील निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थेपासून ते लोकसभा आणि राज्यसभेच्या निवडणुकांपर्यंत ही आघाडी कायम ठेवू”, असे काँग्रेसने म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा :  महागाईचा दुहेरी धक्का; एलपीजीनंतर पेट्रोल-डिझेल महागणार? कारण समोर

काँग्रेस आणि द्रमुक यांनी तमिळनाडूतील आघाडी मोडली असली तरी भाजपाविरोधात असलेल्या राष्ट्रीय इंडिया आघाडीत एकत्र राहण्याचा मानस व्यक्त केला आहे. काँग्रेस नेत्यांनी म्हटले की, तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस हे पश्चिम बंगालमध्ये वेगवेगळे लढत असले तरी त्यांनी इंडिया आघाडीत राहण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. तसेच इतर राज्यातही अशीच परिस्थिती दिसते. असे असले तरी काँग्रेसच्या निर्णयामुळे इंडिया आघाडीच्या एकसंधतेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

काँग्रेस समितीचे नेते आणि तमिळनाडूचे प्रभारी गिरीश चोडणकर यांनी काँग्रेसच्या भूमिकेचे पत्र प्रसिद्ध केले आहे. या पत्रात म्हटले की, विजयचा टीव्हीके पक्ष भाजपाबरोबर कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवणार नाही, या अटीवर त्यांना पाठिंबा दिला जात आहे.

विशेष करून, काँग्रेस पक्षश्रेष्ठींना तमिळनाडू सरकारमध्ये भाजपा किंवा त्यांच्या हस्तकांचा कोणताही समावेश होऊ द्यायचा नव्हता. तथापि, चोडणकर यांनी काढलेल्या पत्रात मात्र हस्तक या शब्दाचा उल्लेख केलेला नाही. टीव्हीके आणि अण्णाद्रमुक यांच्यात आघाडीची चर्चा सुरू असल्यामुळे हा उल्लेख टाळला असल्याचे बोलले जाते.

राहुल गांधी आणि स्टॅलिन यांच्यात बेबनाव
तमिळनाडूच्या जनतेने टीव्हीके पक्षाला जनमत दिले असून काँग्रेसनेही याचा आदर करून त्यांना पाठिंबा द्यायला हवा, असा मतप्रवाह काँग्रेसच्या निवडून आलेल्या आमदारांमध्ये आहे. तसेच काँग्रेस आणि द्रमुक यांच्यातील संबंध गेल्या काही काळापासून ठीक नव्हते. राहुल गांधी आणि एमके स्टॅलिन यांच्यात एकेकाळी सलोख्याचे संबंध होते. मात्र नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांनी एकत्र एका मंचावर येणे टाळले होते. एवढेच नाही तर निवडणुकीआधी राहुल गांधी यांनी विजयच्या पक्षाशी जागावाटपाची चर्चा करण्यासाठी रस दाखवला होता. मात्र काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि तमिळनाडूमधील नेत्यांनी द्रमुकबरोबरच आघाडी कायम ठेवण्याचा आग्रह धरल्यानंतर निवडणूकपूर्व आघाडी होऊ शकली नाही.

‘काँग्रेसने पाठीत खंजीर खुपसला’, द्रमुकची टीका
विजय यांच्या टीव्हीकेबरोबर आघाडी करण्याचा निर्णय घेतला असताना माजी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या डीएमके पक्षाने काँग्रेसवर जोरदार टीका केली. एनडीटीव्हीला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत डीएमकेचे प्रवक्ते सरवणन अण्णादुराई यांनी काँग्रेसने ‘पाठीत खंजीर खुपसला’ असे विधान केले.

हे सुद्धा वाचा :  खासगी शाळांत राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांवर बंदी; तामिळनाडू सरकारचा मोठा निर्णय

द्रमुक बरोबर आघाडी केल्यामुळे काँग्रेसला पाच जागा जिंकता आल्या अन्यथा त्यांना एकाही जागेवर विजय मिळवणे कठीण होते, असा टोला अण्णादुराई यांनी लगावला. भाजपा आणि मोदी यांच्याविरोधात एकही शब्द न बोलणारा टीव्हीके भाजपाच्या जवळचा आहे, असेही अण्णादुराई म्हणाले.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ