अहिल्यानगर | नगर सह्याद्री
केडगावमध्ये दोघा शिवसैनिकांची हत्या झाल्यानंतर झालेल्या दगडफेक आणि रास्ता रोको प्रकरणी शिवसेनेचे दिवंगत माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह ६०० शिवसैनिकांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याचा निकाल लागला असून न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे.
एप्रिल २०१८ मध्ये केडगाव येथे शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर आणि शिवसेनेचे कार्यकर्ते वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडानंतर संतप्त जमावाने केलेली दगडफेक, रास्ता रोको, पोलिसांना शिवीगाळ, सरकारी कामात अडथळा आणणे आणि मृतदेहाची अवहेलना करणे यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
सुरुवातीला पोलिसांनी या गुन्ह्यात सर्व आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याप्रकरणी भादंवि कलम ३०८ लावले होते. मात्र, नंतरच्या तपासात पोलिसांनी हे गंभीर कलम वगळून इतर वाढीव कलमे लावली, त्यामुळे गुन्ह्याचे गांभीर्य काहीसे कमी झाले होते.










