बारामती / नगर सह्याद्री –
राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून काँग्रेसने अखेर माघार घेतली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली होती. परंतु आज आकाश मोरे यांची उमेदवारी मागे घेण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन बारामतीच्या पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केले. पोटनिवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे आज सकाळपासून राज्यात राजकीय विविध घडामोडी आणि ट्विस्ट पाहायला मिळाले.
हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?
हर्षवर्धन सपकाळ पत्रकार परिषदेत म्हणाले की, दोन पोटनिवडणूक महाराष्ट्रात होणार आहे. यामध्ये बारामतीकडे सर्वात जास्त लक्ष लागलं आहे. वैचारिक भूमिका म्हणून भाजपला विरोध करण्यासाठी बारामतीच्या पोटनिवडणूकीत अर्ज भरला होता. बारामती नाही तर देशभरात भाजपच्या विरोधात काँग्रेसने भूमिका घेतली होती. एकूण सहा अर्ज बारामतीसाठी आले होते. परंतु शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी भल्या पहाटे येऊन बारामतीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विनंती केली. अजित पवार यांच्या संदर्भात सहकार्याची भूमिका घ्या अशी विनंती केली. काही जणांनी अपरिपक्व वक्तव्य केली. त्या संदर्भात कुटुंबांनी दिलगिरी व्यक्त केली. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी ही विनंती आणि सूचना दिल्या, अशी माहिती हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली. यानंतर सर्व काँग्रेस नेतृत्व यांच्यासोबत चर्चा केली. लढलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. मात्र संस्कृती आणि संवेदना म्हणून आम्ही बारामतच्या पोटनिवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेत आहोत, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.
बारामतीच्या निवडणुकीतून माघार घ्या, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मला फोन आला होता. परंतु देवेंद्र फडणवीस यांचा फोन येण्याचा आणि निर्णय घेण्याचा काहीही संबंध नाही. देवेंद्र फडणवीसांनी संस्कृती हा शब्द वापरला. तसेच माघार घेण्यासाठी अनेकांनी कळकळीची विनंतीही केली, अशी माहिती हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली. दरम्यान, फडणवीसांनी हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करुन, बारामती पोटनिवडणुकीबाबत चर्चा केली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बारामतीची पोटनिवडणूक लढवत आहेत, त्यांच्याविरुद्ध काँग्रेसने उमेदवार दिला आहे. मात्र सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडीसाठी काँग्रेसने बारामतीतून उमेदवार मागे घ्यावा, अशी विनंती देवेंद्र फडणवीसांनी केली होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुक होत आहे. बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होईल. त्यानंतर 4 मे रोजी बारामतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल.










