समृद्धी वाकचौरेची नासा शैक्षणिक भेटीसाठी निवड
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलची विद्यार्थिनी समृद्धी प्रविण वाकचौरे हिने स्वच्छ ऊर्जा, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत स्वयंपाक प्रणालीवर आधारित “Hydrogen Fuel Operated Stove for Sustainable Cooking”हा अभिनव विज्ञान प्रकल्प विकसित करून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या प्रकल्पाला ईशा फाउंडेशनच्या विज्ञान स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळाला असून, 35 हजार रुपयांचे पारितोषिकही प्राप्त झाले आहे. या प्रकल्पाच्या आधारे तिची नासा शैक्षणिक भेटीसाठी निवड झाली आहे.
समृद्धीने विकसित केलेला हा प्रकल्प पारंपरिक एलपीजी आणि सरपणाला पर्याय म्हणून हरित हायड्रोजनचा सुरक्षित व पर्यावरणपूरक वापर करून स्वयंपाक करण्याच्या संकल्पनेवर आधारित आहे. हायड्रोजनच्या ज्वलनानंतर कार्बन डायऑक्साइडऐवजी मुख्यतः पाण्याची वाफ निर्माण होत असल्याने भविष्यातील स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे.
भारतातील ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणावर सरपणाचा वापर केला जातो, तर शहरी भागात एलपीजीच्या वाढत्या किमती सर्वसामान्यांसाठी आर्थिक भार ठरत आहेत. धुरामुळे महिलांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, जंगलतोड, इंधन गोळा करण्यासाठी लागणारा वेळ आणि वाढते कार्बन उत्सर्जन या समस्यांचा विचार करून समृद्धीने या प्रकल्पाची संकल्पना विकसित केली. वाकचौरे हिच्या या विज्ञान प्रकल्पासाठी विजय दळवी यांनी मार्गदर्शक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
विविध सुरक्षा सुविधांचा समावेश
या मॉडेलमध्ये कमी दाबाच्या हायड्रोजन सिलेंडरमधून नियंत्रित पद्धतीने गॅसचा पुरवठा केला जातो. त्यामध्ये दाब नियंत्रक, फ्लो कंट्रोल व्हॉल्व्ह, विशेष बर्नर, इग्निशन प्रणाली, फ्लेम अरेस्टर, गॅस गळती शोधक आणि ऑटो शट-ऑफ यंत्रणा अशा विविध सुरक्षा सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सुरक्षित, कार्यक्षम आणि प्रदूषणमुक्त स्वयंपाक शक्य होऊ शकतो, अशी संकल्पना या प्रकल्पातून मांडण्यात आली आहे.
घरगुती स्वयंपाकासह उद्योगांमध्ये वापर
या प्रकल्पाचा उपयोग केवळ घरगुती स्वयंपाकापुरता मर्यादित नसून सामुदायिक स्वयंपाकगृहे, वसतिगृहे, कॅन्टीन, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स तसेच लघु व मध्यम उद्योगांमध्येही होऊ शकतो. हा प्रकल्प भारत सरकारच्या छरींळेपरश्र ॠीशशप कूवेीसशप चळीीळेप आणि स्वच्छ ऊर्जा उपक्रमांशी सुसंगत असल्याचे प्रकल्प अहवालात नमूद करण्यात आले आहे.












