बाबा महाराज झेंडे यांचा सरकारला अल्टिमेटम | कोळगाव येथे रास्ता रोको
श्रीगोंदा | नगर सह्याद्री
राज्यातील शेतकर्यांची संपूर्ण कर्जमाफी करा, सातबारा कोरा करा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा थेट इशारा राज्य शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष ह.भ.प. बाबा महाराज झेंडे यांनी दिला. या मागणीसाठी कोळगाव येथे झालेल्या रस्ता रोको आंदोलनात शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले आणि तब्बल दोन तास महामार्ग रोखून धरला.
श्री. हेमंत नलगे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात ह.भ.प. बाबा महाराज झेंडे, राजेंद्र आबा म्हस्के, मधुकाका लगड, अनिल घनवट, अनिल कानगुडे, विश्वासराव थोरात, नितीन नलगे, बाळासाहेब नाहटा, मारुती भापकर, सोमनाथ घाडगे यांच्यासह विविध गावांतील शेकडो शेतकरी उपस्थित होते.
यावेळी बोलताना बाबा महाराज झेंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्यांना दिलेला कर्जमाफीचा शब्द तातडीने पूर्ण करावा, अशी जोरदार मागणी केली. तसेच राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी स्वतः पुढाकार घेऊन शेतकर्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री स्तरावर तोडगा काढावा, असे आवाहनही त्यांनी केले.
मराठा आंदोलनावेळी सरकारने संवाद साधला, मग शेतकर्यांसाठी तोच न्याय का नाही? असा सवाल करत झेंडे यांनी सरकारवर निशाणा साधला. विरोधी पक्षांनीही केवळ निवेदने न देता रस्त्यावर उतरून शेतकर्यांच्या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास २५ तारखेला चिखली येथे रस्ता रोको, तर २७ ते ३० जूनदरम्यान नगर येथे रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. एवढेच नव्हे तर आषाढी वारीत लाखो वारकरी पंढरपुरात एकत्र येणार असून, चंद्रभागेच्या वाळवंटातही कर्जमाफीसाठी जोरदार आंदोलन छेडले जाईल, अशी घोषणा बाबा महाराज झेंडे यांनी केली. शेतकरी आता गप्प बसणार नाही. कर्जमाफी मिळेपर्यंत आंदोलनाची धार अधिक तीव्र केली जाईल, असा निर्धार उपस्थित शेतकर्यांनी व्यक्त केला.










