अहिल्यानगर | नगर सह्याद्री
म्हाडामध्ये घर आणि दुकान मिळवून देतो, असे सांगून एका महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्याकडून वेळोवेळी ३५ लाख ३० हजार १२२ रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील एका महिला तक्रारदाराची ही फसवणूक झाली आहे. संशयित आरोपी दिलीप धनराज भंडारी, धनराज भंडारी, कुसुम भंडारी, अशोक चोपडा आणि इतर (सर्व राहणार सिव्हील हडको, अहिल्यानगर) यांनी संगनमत करून हा गुन्हा केला. संशयितांनी तक्रारदार महिलेला म्हाडामध्ये घर आणि गाळे मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते.
या आमिषाला बळी पडून महिलेने त्यांना रोख स्वरूपात, ऑनलाइन आणि चेकद्वारे एकूण २६ लाख ५२ हजार रुपये दिले. ही रक्कम त्यांनी बँकेतून कर्ज काढून उभी केली होती. कर्जापोटी महिलेने आतापर्यंत ८ लाख ७८ हजार १२२ रुपयांचा भरणा केला आहे. मात्र, पैसे घेऊनही घर किंवा दुकान न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. संशयितांनी या रकमेचा अपहार करून महिलेला शिवीगाळ व धमकीही दिली. अखेर या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश चहेर करत आहेत.










