उच्चस्तरीय बैठकीत निर्देश; अवर्षणग्रस्त भागातील जलसुरक्षेसाठी दोन महत्त्वाच्या योजनांना गती
जामखेड | नगर सह्याद्री
कर्जत तालुक्यातील तुकाई उपसा जलसिंचन योजनेची सर्व प्रलंबित कामे आवश्यक परवानग्यांसह 15 जुलैपूर्वी पूर्ण करून योजनेचा शुभारंभ करावा, तसेच मिरजगाव येथील भैरवनाथ उपसा जलसिंचन योजनेचा परिपूर्ण प्रस्ताव ऑगस्टअखेरपर्यंत शासनाकडे मंजुरीसाठी सादर करावा, असे निर्देश विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.
विधानभवन येथे प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तथा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत तुकाई उपसा जलसिंचन योजना आणि भैरवनाथ उपसा जलसिंचन योजनेच्या कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी दोन्ही योजनांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेऊन संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ तातडीने उपलब्ध व्हावा, यासाठी तुकाई योजनेची उर्वरित कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याची आवश्यकता असल्याचे प्रा. शिंदे यांनी यावेळी नमूद केले. तुकाई उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित झाल्यानंतर कर्जत तालुक्यातील 19 गावांना पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा मोठा लाभ होणार आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील शेतीला बळ मिळण्यास मदत होणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
यावेळी मिरजगाव परिसरातील भैरवनाथ उपसा जलसिंचन योजनेचाही आढावा घेण्यात आला. या योजनेचा सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता केलेला परिपूर्ण प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी तातडीने सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. या योजनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न माग लागण्यास मदत होणार आहे. अवर्षणप्रवण भागातील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी उपलब्ध करून देणे, सिंचन क्षमता वाढविणे आणि जलसुरक्षेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे प्रा. शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.
बैठकीस जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर, मिरजगावचे सरपंच नितीन खेतमाळीस, पुणे वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक केशव वाबळे, मुख्य अभियंता नितीन दुसाने, अधीक्षक अभियंता धनंजय दाहेदार, हरिभाऊ गिते, कार्यकारी अभियंता पांडुरंग गायसमुद्रे, डी. वाय. गुळूमकर, सु. वि. गांगुर्डे तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.










