पाच गावांतील नागरिकांचे एसपींना निवेदन
पाथर्डी | नगर सह्याद्री
पाथर्डी तालुक्यातील सोमठाणे, नलवडे बुद्रुक, वरूर, सुसरे, आखेगाव व कोरडगाव या गावांमध्ये काही व्यक्तींनी संघटित गुन्हेगारीचे जाळे उभे करून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर सुमारे 500 ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांची भेट घेत निवेदन सादर करून संबंधितांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली. तसेच तातडीने कारवाई न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार संतोष खवले, राहुल खवले, माणिक खवले, अमोल खवले, चिमाजी धनवडे व त्यांच्यासोबतच्या सुमारे वीस ते पंचवीस जणांनी परिसरात कथितपणे संघटित गुन्हेगारी सुरू केली आहे. जुगार, मटका, वाळू तस्करी, अवैध सावकारी, बेकायदेशीर ताबे घेणे आदी आर्थिक फायद्याच्या कथित बेकायदेशीर व्यवसायातून या टोळीने गावागावांत दहशत निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधितांकडून महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांना लोखंडी रॉड, लाकडी दांडे आणि तलवारीच्या धाकाने बेदम मारहाण करण्यात आली असून अनेकांवर जीवघेणे हल्ले झाले आहेत. काही प्रकरणांमध्ये कलम 307 सारखे गंभीर गुन्हे दाखल असूनही संबंधित आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याचा आरोप करण्यात आला.
तसेच, काही आरोपींचे पोलिसांशी आर्थिक संबंध व नातेवाईक असल्यामुळे त्यांना संरक्षण मिळत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनात केला. यावेळी पार्वती काकडे, अमोल नलवडे, रामेश्वर काकडे, आप्पासाहेब नलवडे, बुगाबी शेख, मनीषा नलवडे, अर्जुन काकडे यांच्यासह सुमारे 500 ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान एसपी सुदर्शन मुम्मका यांनी नागरिकांना धीर देत संबंधित ओरोपींना तत्काळ अटक करण्याच्या सुचना पाथड पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना दिल्या.










