बनावट वैद्यकीय कागदपत्रांच्या आधारे उपचार / बोगस डॉटरविरुद्ध गुन्हा दाखल
राहुरी | नगर सह्याद्री
बनावट वैद्यकीय पदवी व नोंदणी प्रमाणपत्रांच्या आधारे नागरिकांवर उपचार केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात एका बोगस डॉटरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तन्वीर हारून देशमुख (रा. बारागाव नांदूर, ता. राहुरी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत बोगस वैद्यकीय व्यवसाय शोध समितीचे जिल्हा सदस्य तसेच ग्रामीण रुग्णालय राहुरीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गणेश बाबासाहेब मिसाळ यांनी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार,डॉ.दीपाली गायकवाड आणि टीममधील सोमनाथ आहेर, राजेंद्र पवार, संतोष तमनर यांनी नगर-मनमाड महामार्गावरील गॅलेसी निसर्गोपचार केंद्रात छापा टाकला. संबंधित व्यक्ती वैद्यकीय व्यवसाय करत असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती. त्यानंतर आरोग्य विभागाच्या पथकाने संबंधित ठिकाणी भेट देऊन तपासणी केली.
तपासणी दरम्यान संबंधित व्यक्तीकडे विविध वैद्यकीय अभ्यासक्रम व नोंदणीची कागदपत्रे आढळून आली. मात्र, संबंधित प्रमाणपत्रांची विविध वैद्यकीय संस्था व शासकीय विभागांकडून पडताळणी करण्यात आली असता अनेक कागदपत्रे संशयास्पद व अवैध असल्याचे समोर आले. तसेच संबंधित व्यक्तीला वैद्यकीय व्यवसाय करण्यास आवश्यक अधिकृत नोंदणी नसल्याचेही स्पष्ट झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.फिर्यादीनुसार, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल तसेच राष्ट्रीय वैद्यकीय संस्थांकडून प्राप्त माहितीनुसार संबंधित व्यक्तीला अधिकृत डॉटर म्हणून काम करण्याचा अधिकार नसताना विविध उपचार पद्धतींचा वापर करून रुग्णांवर उपचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे हे करीत आहेत.










