- जाहिरात -spot_img
breaking news

शरद पवारांचा कट्टर खासदार संघाच्या छायेत! लंके साहेब, तुम्ही नक्की जिरवली कोणाची?

धर्मनिरपेक्ष मतांचा गठ्ठा मिळूनही आरएसएस, भाजपाशी जवळीक | धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादीचे खासदार की कट्टर हिंदुत्ववादी आरएसएसचे स्वयंसेवक?
सारीपाट / शिवाजी शिर्के-
राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशातील राजकारणात आता हिंदुत्ववादी विरुद्ध धर्मनिरपेक्षवादी अशी उभी फूट पडली असल्याचे स्पष्टपणे समोर आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांतील अखंड भारताच्या निर्मितीसाठी दीर्घकालीन रणनीती राबवली जात आहे. काही राज्यांचा अपवाद वगळला तर आता बहुतांश राज्यांमध्ये संघ प्रणीत भाजपची सत्ता आहे. भाजपची मातृ संस्था असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसच्या कार्यक्रमाला धर्मनिरपेक्ष समजल्या जाणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खा. नीलेश लंके यांनी नुकतीच उपस्थिती लावली. संघ स्वयंसेवकांशी यावेळी त्यांनी संवादही साधला. संघ कार्याचे धडेच गिरवले. एकीकडे संघाच्या मार्गदर्शनातून नितेश राणे, गोपीचंद पडळकर, महेश लांडगे, कोरटकर यांच्यासारखे नेते, लोक विशिष्ट समुदायाला टार्गेट करत सातत्याने गरळ ओकत असल्याचा आरोप होत असताना संघ विचारधारे वर कधीही टीका न करणारे लंके स्वतःच संघ प्रणित कट्टर संस्थेच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याने धर्मनिरपेक्ष मतदारांचा त्यांच्याकडून हा एक प्रकारचा विश्वासघात मानला जात आहे. खासदार झाल्यापासूनचा लंके यांचा एकूणच प्रवास पाहता ते राजकीय दृष्ट्‌‍या भरकटले आहेत की काय असा प्रश्न उपस्थित होतो.

विधानसभेचे वेध लागले असतील तर लोकसभेला दुसऱ्याला संधी देणार का?
पत्नीचा पराभव झाल्यानंतर पारनेर नगर मधून विधानसभा लढवण्याची घोषणा लंके यांनी करून टाकली आहे. एक प्रकारे लोकसभेचे मैदान सोडल्याचेच त्यांनी जाहीर केले आहे. अवघ्या दोनच वर्षात जर ते मतदार, त्यांच्यासाठी जीवाचं रान केलेल्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून पळ काढणार असतील तर मतदार संघातील विकास कामे रखडल्यास त्याची महागडी किंमत मात्र सामान्य जनतेला मोजावी लागेल. अजून तीन वर्ष जायची आहेत. खासदारकी झेपत नव्हती तर लढायचं कशाला?, पळच काढायचा असेल तर राजीनामा द्या, पोट निवडणुकीतून मतदार पुढील तीन वर्षांसाठी पूर्णवेळ खासदार निवडतील अशा प्रतिक्रिया जनतेतून येऊ लागली असून त्यात गैर काहीच नाही. अर्थात, लंके खासदारकीचा राजीनामा देणार नाहीत. राष्ट्रवादीकडून आमदार झाल्यानंतर त्यांच्या पत्नी शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्या होत्या. त्यांनी त्या गटातून शेवटपर्यंत राजीनामा दिला नव्हता.

लंके साहेब, तुम्ही नक्की जिरवली कोणाची?
कुणाची तरी जिरवायची होती म्हणून लोकसभा लढवली, असं धक्कादायक वक्तव्य काही दिवसांपूव खा. लंके यांनी केलं. दक्षिणेच्या मतदारांनी कुणाची जिरवण्यासाठी नव्हे तर विकास कामे करण्यासाठी त्यांना निवडून दिलं होतं. वैयक्तिक राजकीय हेव्या – दाव्यात कोणाची जीरो अथवा ना जीरो मात्र दक्षिणेच्या लाखो मतदारांची कायमची जिरली हेच वास्तव आहे. विशेषत: श्रीगोंदा तालुक्यातून ज्या प्रतिक्रिया आल्या त्यातून बरेच काही समोर आले.

विखे विरोधकांचे छुपे बळ खा. लंकेंच्या पाठीशी!
विखे पाटलांचे पारंपारीक राजकीय विरोधक राहिलेल्या विवेक कोल्हे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने नुकतीच विधान परिषदेवर वण लागली. लंके त्यांच्या सत्कारासाठी मध्यरात्री कोपरगावात पोहोचले. फडणवीस समर्थक राम शिंदे यांच्याशी लंकेचा दोस्ताना सर्वश्रुत आहे. अलीकडील काळामध्ये थेट देवाभाऊंशी देखील जवळीक साधण्याचा लंके यांचा सातत्याने प्रयत्न सुरू असतो. जिल्ह्यात विखे विरोधी तोफ डागताना भाजप मधील विखे विरोधकांचे (मुख्यमंत्र्यांसह) छुपे बळ लंकेच्या पाठीशी असल्याचे अनेकदा स्पष्टपणे समोर आले. खा. लंके यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना रायगडावरील कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. दिल्लीच्या राजकारणाची हवा कायमच गरम असते. विशेषत: मोदींचे सरकार आल्यापासून ऑपरेशन लोटस कायम ऑन असते. रात्रीतून आपचे खासदार राघव चड्डा यांच्यासह सात खासदारांनी पक्षांतर करत भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. उद्या जर शरद पवारांच्या खिळखिळ्या झालेल्या राष्ट्रवादीच्या खासदारांनी रात्रीतून असा काही डाव साधला तर आश्चर्य वाटू नये.

हे सुद्धा वाचा :  ...तर दोन महिन्यांपूवच आमदार झालो असतो; डॉ. सुजय विखे पाटील काय म्हणाले पहा...

म्हणून, दादा पाटील शेळके पुन्हा कधीच खासदार, आमदार होऊ शकले नाहीत!
लंके पुन्हा आमदार होण्याच स्वप्न रंगवू लागले आहेत. प्रतिस्पध उमेदवार विखे पाटलांच्या घराणेशाहीवर लंकेंनी लोकसभा लढताना सडकून टीका केली. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या मैदानात पत्नी राणी लंके यांना उतरवत लंकेंनी स्वतःच घराणेशाहीला सुरुवात केली. पारनेरचा मतदार सुज्ञ आहे. लंकेचा दांभिकपणा मतदारांना रुचला नाही. जायंट किलर म्हणून पुढे आलेल्या लंकेंना अवघ्या काही महिन्यातच स्वतःच्याच होम ग्राउंडवर पराभवाची धूळ चाखावी लागेल. दिवंगत दादापाटील शेळके खासदारकी लढले. जिंकले ही. त्यांनी विजयाताई कुटे यांना त्यांच्या जागी आमदारकीसाठी उभे केले. कुटेंचा दारूण पराभव करत अपक्ष निवडून येत दिवंगत शिवाजी कर्डिले यांचा राजकीय उदय झाला. दादापाटील मात्र पुन्हा कधीच खासदार, आमदार होऊ शकले नाही. लंकेची वाटचाल पाहता भविष्यात त्यांचा दादापाटील झाल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

…तर दक्षिणेला पूर्ण वेळ खासदार मिळाला असता!
सुजय विखे पाटील यांचा जनसंपर्क तुटला होता. कांद्याच्या भावामुळे शेतकरी नाराज होता. इंडिया आघाडीच्या संविधान धोक्यात या टॅग लाईनमुळे विरोधी वातावरण निर्माण झाले होते. त्यातून झालेल्या पराभवानंतर मात्र सुजय विखे यांनी आपल्या चुका दुरुस्त केल्या. मतदार, कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवला. आता खासदार नसतानाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे व सरकारच्या माध्यमातून निधी आणणे, विकास कामे करणे, लोकांचे प्रश्न सोडवणे याचा सपाटा त्यांनी लावला आहे. हीच चूक दुरुस्त करण्याची उपरती सुजय विखेंना मागच्याच टर्म मध्ये झाली असती तर आज नगर दक्षिणेला पाच वर्षांकरिता पूर्णवेळ खासदार मिळाला असता. पण राजकारणात जर – तरला महत्त्व नसते हेच खरे.

अर्ध्यातून पळ काढण्यापेक्षा दिल्ली दरबारी वजन खर्च करणार का?
2019 ते 2024 या 5 वर्षांच्या कार्यकाळात दक्षिण मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी आणला गेला. विविध पायाभूत कामे माग लावली गेली. सुरत-चेन्नई एक्सप्रेसवे, कल्याण-विशाखापट्टणम महामार्ग, नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्पाला गती, दोन उड्डाण पूलांसह नगर – दौंड रोडचे काम माग लागले, शहरा भोवतीचा रिंग रोड पूर्ण झाला, जलसंधारण आणि पाणीपुरवठा योजना राबविल्या गेल्या, अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या नगर शहरातील उड्डाणपूलाचे काम माग लागले, तेव्हा मंजूर झालेली नागापूर उड्डाणपूल, सीना नदीवरील कल्याण रोडच्या उड्डाण पुलाची कामे सध्या प्रगती पथावर आहेत. मात्र 2024 च्या लोकसभा निकालानंतर म्हणजेच लंके हे खासदार झाल्यानंतर विकास कामांना खीळ बसली आहे. यासाठी अर्ध्यातच पळ काढण्याऐवजी दिल्ली दरबारी निधी मिळवण्यासाठी वजन खर्च करण्याची गरज आहे.

हे सुद्धा वाचा :  काँग्रेसची स्वबळाची हाक...कुठे लढणार

कार्यकर्त्यांच्या निवडणुकांत नीलेश लंके सपशेल नापास!
खासदार लंके यांच्या नेतृत्वाखाली नगर मनपा निवडणूक मविआ लढली. स्वतःच्याच राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक त्यांना निवडून आणता आला नाही. मुस्लिम बहुल मुकुंद नगर मधून काँग्रेसचे दोन नगरसेवक निवडून आले. ठाकरे शिवसेनेचे योगीराज गाडे विजयी झाले. योगीराज यांच्या वहिनी दिवंगत शिवाजी कर्डिले यांच्या कन्या व आ. संग्राम जगताप यांच्या मेहुणी ज्योती गाडे महापौर झाल्या. गाडे – कर्डिले – जगताप या सो-धा पक्षाने ही किमया घडवली. त्यामुळे त्या विजयात ही लंकेंचा कोणता करिष्मा नव्हता. कार्यकर्त्यांच्या मनपा निवडणुकीत नापास झालेल्या लंकेंना आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत स्वतःच्या पारनेर मतदार संघातील चक्रव्यूह भेदण्याचे कडवे आव्हान असणार आहे. तिथेही नगर शहराची पुनरावृत्ती झाली तर मात्र पुढील विधानसभेचा महामेरू गाठणे लंके यांच्यासाठी अत्यंत कठीण ठरणार आहे.

बाळासाहेब थोरात यांना किंमत मोजावी लागली!
एकेकाळी राज्याच्या मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार म्हणून जेष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाहिले जात होते. लाघवी, हसतमुख, सुस्वाभावी सुसंस्कृत, सोज्वळ चेहरा म्हणून थोरात यांची संपूर्ण राज्यात ओळख. संगमनेरच्या जनतेने त्यांना सलग आठ टर्म आमदारकी बहाल केली. लंकेना खासदार करण्यासाठी संगमनेरची यंत्रणा चहूबाजूंनी मैदानात उतरवत स्वतः थोरात लंकेच्या रथाचे सारथ्य करत कृष्ण बनले. त्यात विखेंचा पराभव झाला. मात्र याची परतफेड विखे पाटील पिता-पुत्रांनी संगमनेर मध्ये थोरात यांना पराभूत करत केली. यात थोरात यांची मात्र पुरती जिरली. लोकसभा विजयानंतर संगमनेर कारखाना स्थळावर थोरात यांचा सत्कार स्वीकारताना लंके यांनी आपला फक्त चेहरा होता विखे पराभवाचे खरे सूत्रधार थोरात होते असे म्हणत राजकीय जाळ थोरात यांच्या अंगावर टाकला.

भानुदास कोतकरांना मोजावी लागली होती एकेरी बोलण्याची किंमत!
नगरच्या राजकारणावर बऱ्यापैकी पकड मिळाल्यानंतर काँग्रेसचे तत्कालीन नेते भानुदास कोतकर यांनी थेट ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटलांनाच आव्हान दिले. एका कार्यक्रमात त्यांनी विखे पाटलांचा एकेरी उल्लेख करत व्यक्तीगत टिका केली होती. त्यानंतर विखे पाटलांनी त्यावर कोणतीही जाहीर प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, कोतकर यांना त्या टिकेची मोठी किंमत मोजावी लागली. कोतकर राजकारणातून बाहेर पडण्यास अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या असल्या तरी त्यात विखे पाटलांवर त्यांनी केलेल्या टिकेची किंमत त्यांना मोजावी लागली हा इतिहास आहे. दोन दिवसांपूव खा. लंके यांनी पालकमंत्री विखे पाटलांवर एकेरी शिवराळ भाषा वापरली. अरे-तुरे बोलणारी त्यांची ही भाषा समोर आली असताना विखे पाटलांनी त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. याचा अर्थ विखे पाटलांनी विषय सोडून दिला असा होत नाही. येणाऱ्या काळात त्याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही.

हे सुद्धा वाचा :  मनपाच्या स्थायी, मबाक समिती सभापती निवडणुकीसाठी मंगळवारी सभा

राहुरी पोटनिवडणुकीत अत्यंत अपमानकारक पराभव!
राहुरी विधानसभा पोट निवडणुक महायुती डॉ. सुजय विखे व आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली तर मविआ निलेश लंकेच्या नेतृत्वाखाली लढली. मविआ उमेदवार मोकाटे यांना अवघी 27 हजार 506मतं पडली. तर युतीचे उमेदवार अक्षय कर्डिले हे 1 लाख 12 हजार 587 मतांच्या विक्रमी फरकाने निवडून आले. राष्ट्रवादीचा अपमानकारकरीत्या पराभव झाला. लोकसभा विजयानंतर राहुरी – नगर – पाथडच्या कार्यकर्त्यांकडे लंके यांनी पाठ फिरवल्यामुळे अनेक प्रमुख कार्यकर्ते प्रचाराच्या मैदानातच उतरले नाहीत. हीच परिस्थिती शेवगाव, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा तालुक्यांमध्ये आहे. आगामी झेडपी, पंचायत समिती निवडणुकीत नगर दक्षिणेतील गटांमध्ये मविआ लंके यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहे. त्याहीपेक्षा पारनेरमध्ये त्यांचे अस्तित्व पणाला लागणार हे नक्की!

वस्तादावरच डाव टाकण्यात पटाईत!
विधानसभेचे माजी उपसभापती विजय औटी यांच्या तालमीत लंके तयार झाले. मात्र त्यांनी वस्तादा वरच डाव टाकला. दिवंगत अजित पवारांचे बोट पकडले. अजित पवारांच्या आशीर्वादाशिवाय लंकेचे आमदार होणे केवळ अशक्य होते. मात्र आमदार झाल्यानंतर अजित दादांना सोडून ते मोठ्या पवारांच्या मांडीवर जाऊन बसले. त्यामुळे आपले इप्सित साध्य करण्यासाठी नेता बदलण्यात पटाईत असणाऱ्या लंके यांची आरएसएसकडे वळालेली पाऊलं बरीच बोलकी आहेत.

व्हिडिओ, ऑडिओ क्लिपने राष्ट्रवादीची प्रतिमा मलिन!
लंके यांच्या सोशल मीडियाचे काम सांभाळणारा किशोर परभणे याची पुण्यातील एका महिले सोबतची कथित ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर चांगलीच व्हायरल झाली आहे. याचा संबंध थेट त्यांच्याशी जोडला जात आहे. राहुरी पोटनिवडणुकी साठी ज्या गोविंद मोकाटे यांना राष्ट्रवादीने उमेदवार केले होते त्यांच्यावर देखील बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर व्हायरल झालेला व्हिडिओ पुन्हा निवडणूक काळात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. राष्ट्रवादीचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यावर देखील बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून अत्याचाराचा कथित व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. हायकोर्टाचा जामीन फेटाळल्या नंतरही ते फरारच आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सातत्याने महिलांशी निगडित अत्याचार प्रकरणांचे आरोप आणि पुरावे म्हणून व्हिडिओ व्हायरल होत असल्यामुळे पक्षाची प्रतिमा जनमानसात मलिन झाली आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ