श्रीगोंदा | नगर सह्याद्री
चोरीच्या वाहनांचा शोध घेण्यासाठी श्रीगोंदा पोलिसांनी शहरात विना नंबर प्लेट फिरणाऱ्या दुचाकी वाहनांविरोधात विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली. या मोहिमेत एकूण 49 वाहनांची तपासणी करण्यात आली असून 94 हजार 500 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
काही आरोपी चोरीच्या दुचाकी वाहनांच्या नंबर प्लेट काढून त्यांचा वापर करत आहेत. या माहितीच्या आधारे गुरुवारी (दि. 18) श्रीगोंदा शहरात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली.
या कारवाईदरम्यान विना नंबर प्लेट असलेली 49 दुचाकी वाहने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आणून त्यांची सखोल पडताळणी करण्यात आली. वाहनांची आरसी बुक, चेसिस नंबर आणि इंजिन नंबरची खात्री करून नियमांचे पालन करणाऱ्या 34 वाहनांना जागेवर नंबर प्लेट बसवून दंडात्मक कारवाईनंतर सोडण्यात आले.
उर्वरित 16 वाहनांच्या मालकांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्याने ती वाहने पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत.मोटार वाहन कायद्याअंतर्गत विना नंबर प्लेट आणि विना वाहन परवाना वाहनचालकांविरोधात कारवाई करत एकूण 94 हजार 500 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.श्रीगोंदा शहर व पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांना आपल्या वाहनांच्या पुढील व मागील बाजूस अधिकृत नंबर प्लेट बसविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. अन्यथा अशा वाहनांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.










