राहुरी | नगर सह्याद्री
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचा पुढील हप्ता मंजूर करण्याच्या प्रक्रियेत मदत करण्यासाठी वीस हजार रुपयाची लाच स्वीकारताना आणि लाच घेण्यास प्रोत्साहन देणारा ग्रामसेवकासह तीन लोकसेवकांना लाच प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. याप्रकरणी राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीमध्ये सात्रळ येथील ग्राम विकास अधिकारी हैदर पटेल (रा. वृंदावन कॉलनी, श्रीरामपूर रोड, राहुरी फॅक्टरी), कंत्राटी लिपिक ज्ञानदेव डुकरे (रा. सात्रळ ता.राहुरी) आणि पंचायत समिती येथील कंत्राटी गृहनिर्माण अभियंता सचिन ब्राह्मणे (रा.समतानगर, वेताळबाबा चौक, लोणी ता, राहता) यांचा समावेश आहे.या प्रकरणात तक्रारदार यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मिळण्याकरिता अर्ज केला होता. सन 2023 मध्ये तक्रारदार यांना घरकुल मंजूर झाले होते. घरकुल बांधकामाकरिता अनुदानाचा पहिला हप्ता 15 हजार रुपये, दुसरा हप्ता 50 हजार रुपये तक्रारदारांना प्राप्त झाला होता.
तक्रारदार यांना घरकुलाचे बांधकाम करण्याकरिता अनुदानाचा हप्ता 70 हजार रुपये मंजूर करण्याच्या प्रक्रियेमध्ये मदत केल्याच्या मोबदल्यात व घरकुलाच्या बांधकामाकरिता मिळणाऱ्या अनुदानाचे पुढील हप्ते मंजूर करण्याचा प्रक्रियेत मदत करण्यासाठी आरोपी डुकरे पटेल व ब्राह्मणे यांनी 20 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदाराने 29जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर येथे रीतसर तक्रार नोंदवली होती. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीप्रमाणे 30 जून रोजी लाच मागणी पडताळणी केली असता लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार 30 जून रोजी सापळा कारवाईदरम्यान आरोपी डुकरे यांनी लाच रक्कम 20 हजार रुपये तक्रारदार यांच्याकडून स्वीकारली. आरोपी ब्राह्मणे यांनी डुकरे याला लाच स्वीकारण्यास प्रत्यक्ष प्रोत्साहन दिले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.










