कर्नाटक : गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत होत्या. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आता सिद्धरामय्या यांची जागा काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. कर्नाटकच्या जनतेच्या हितासाठी मी हा राजीनामा देत आहे, असे सिद्धरामय्या यांनी सांगितले आहे.
सिद्धरामय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनामा दिल्याचे जाहीर केले आहे. तीन वर्षांपूर्वी कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी डी.के. शिवकुमार हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. ते मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये होते. परंतु सिद्धरामय्या यांचा राजकीय अनुभव मोठा असल्याने त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली होती. परंतु सिद्धरामय्या मुख्यमंत्री झाल्यानंतर तेव्हाच अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्यूला ठरलेला होता. अगोदरच्या अडीच वर्षात सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री असतील आणि नंतरच्या अडीच वर्षात डी.के. शिवकुमार हे मुख्यमंत्री असतील, असे ठरवण्यात आले होते. त्यानुसारच आता सिद्धरामय्या यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे.
दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कर्नाटकमधील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीनंतर सिद्धरामय्या यांनी राजीनामा द्यावा, असे सांगण्यात आले होते. आज सिद्धरामय्या यांनी आपल्या कर्नाटकातील निवासस्थानी मंत्रिमंडळाची ब्रेकफास्ट बैठक घेतली आणि आता त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.










