जिल्हा कबड्डी असोचे सेक्रेटरी प्रा. शशिकांत गाडे यांची माहिती
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
जिल्हा कबड्डी असोसिएशनर्ते नुकत्याच पार पडलेल्या विविध राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणार्या खेळाडू व प्रशिक्षकांचा गौरव सोहळा रविवार, दि. 26 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती अहिल्यानगर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सेक्रेटरी शशिकांत गाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
2 ते 6 एप्रिलदरम्यान सिन्नर (जि. नाशिक) येथे झालेल्या 73 व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गट कबड्डी अजिंययपद निवड चाचणी स्पर्धेत अहिल्यानगर जिल्हा पुरुष संघाने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. सलग पाचव्या वर्षी अंतिम फेरी गाठत संघाने दोन वेळा विजेतेपद व तीन वेळा उपविजेतेपद मिळण्याची ऐतिहासिक नोंद केली आहे.
याशिवाय, 25 ते 29 नोव्हेंबर 2025 रोजी बोपखेल (पुणे) येथे झालेल्या 52 व्या राज्य कुमार गट स्पर्धेत जिल्ह्याच्या मुलांच्या संघाने उपविजेतेपद मिळवले. तसेच 5 ते 9 डिसेंबर 2025 दरम्यान झालेल्या 36 व्या राज्य किशोर-किशोरी गट स्पर्धेत किशोरी संघाने उपविजेतेपद, तर किशोर संघाने तृतीय क्रमांक मिळवून जिल्ह्याचे नाव उज्वल केले.
या उल्लेखनीय यशाच्या पार्श्वभूमीवर सहकार सभागृह, अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे खेळाडू, प्रशिक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे. या सोहळ्याला अध्यक्षस्थानी माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील असतील, तर खासदार गजानन किर्तीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय महापौर ज्योती गाडे, उपहापौर धनंजय जाधव, आयुक्त यशवंत डांगे, अर्जुन पुरस्कार प्राप्त पंकज शिरसाठ, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, मोहन गायकवाड, मंगल पांडे, राणाप्रताप तिवारी, गजानन पवार, संतोष गायके यांसह विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. पत्रकार परिषदेला जयंत वाघ यांच्यासह अहिल्यानगर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
हा कार्यक्रम विजेत्या खेळाडूंचा गौरव करण्याबरोबरच नवोदित खेळाडूंना प्रेरणा देण्यासाठी आयोजित करण्यात आला असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अकॅडमी सुरु करण्याचा मानस
जिल्ह्यातील कबड्डी पट्टू चांगली कामगिरी करत आहेत. सलग पाच वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तीन वेळा उपविजेता व दोन वेळा विजेतेपद मिळाले आहे. जिल्हा कबड्डी असोसिएशनच्यावतीने खेळाडूंनासाठी वेळोवेळी कॅम्पचे आयोजन करण्यात येते. खेळासाठी राखीव असलेल्या जागेसंदर्भात असोसिएशन लवकरच महापालिकेला प्रस्ताव देणार आहे. दोन तीन वर्षात खेळाडूंसाठी अकॅडमी सुरु करण्याचा मानस असल्याचे सेक्रेटरी प्रा. शशिकांत गाडे, उपाध्यक्ष जयंत वाघ यांनी सांगितले.










