अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काल मंगळवारी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. रात्री उशिरापर्यंत ही मिरवणूक चालली. या मिरवणुकीत अबालवृध्द मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात करण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार न घडता मिरवणूक शांततेत पार पडली. शहरात निघालेल्या मिरवणुकीत भीमगितांच्या तालावर तरूणाईने ठेका धरला होता. जय भीमच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता. या मिरवणुकीत 11 मंडळांनी सहभाग नोंदवला.
सांयकाळी पाच वाजता मिरवणुकीस प्रारंभ झाला. मार्केट यार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मिरवणुकीस सुरूवात झाली. इम्पिरियल चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, माळीवाडा वेश, पंचपीर चावडी, माणिक चौक, कापडबाजार, तेलीखुंट, चितळे रोड, चौपाटी कारंजा, दिल्लीगेट मार्गे नीलक्रांती चौक अशी मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकीत डीजेच्या तालावर आणि भीमगितांवर तरूणाई थिरकली. या मिरवणुकीत सिध्दार्थ गु्रप बालिकाश्रम रोड, कॅम्प कौलारू मित्रमंडळ सर्जेपुरा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सावेडी, नीलक्रांती मित्रमंडळ नगर शहर, मिलिंद तरूण मंडळ मंगलगेट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती सिध्दार्थनगर, भारतीय बौध्द महासभा, पँथर गु्रप सिध्दार्थनगर, एनकेएमएम गु्रप, नीलक्रांती चौक, वर्ल्ड किंग गु्रप माळीवाडा, सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अशी मंडळे सहभागी झाली होती. नगर शहरासह भिंगार, केडगाव येथेही मिरवणुका काढण्यात आल्या. मिरवणूक शांततेत पार पाडावी, यासाठी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.










