चार अट्टल गुन्हेगार गजाआड, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
सोलर प्लांटमधून केबल चोरणार्या सराईत टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहे. जेऊर (ता. नगर) शिवारातील ‘अवाडा सोलर कंपनी’च्या प्लांटमध्ये तब्बल ६,५०० मीटर केबल लांबवणार्या ४ अट्टल गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जेऊर बायजाबाई येथील घुरवडी डोंगर परिसरात १८ मार्चच्या रात्री अवाडा सोलर प्लांटमध्ये चोरट्यांनी तब्बल ६,५०० मीटर लांबीची कॉपर (तांब्याची) केबल लंपास केली होती. याप्रकरणी सोमनाथ तोडमल यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक तपास सुरू केला. खबर्यामार्फत पोलिसांना ठोस माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार संतोष अशोक जाधव हा त्याच्या साथीदारांसह चोरीचा माल विकण्यासाठी शेंडी बायपास रोडने येणार आहे. तपास पथकाने तातडीने शेंडी बायपासवरील किनारा हॉटेलच्या परिसरात सापळा लावला. काही वेळातच पांढरा पिकअप आणि मोटारसायकल वेगाने येताना दिसली.
पोलिसांनी दोन्ही वाहने अडवून चौघांना ताब्यात घेतले. मुख्य सूत्रधार संतोष अशोक जाधव (वय २८, रा. प्रवरासंगम, नेवासा), करण वैश्य भोसले (वय २०, रा. भेंडाळा, ता.गंगापूर), मनोज सुनील लिंभोरे (वय २३, रा. प्रवरासंगम, नेवासा), परमेश्वर वैश्य भोसले (वय ३९, रा. भेंडाळा, ता.गंगापूर जि. संभाजीनगर) या चौघांना ताब्यात घतले. त्यांच्याकडून तांब्याची दोनशे किलो तार, महिंद्रा पिकअप, मोटारसायकल, ४ मोबाईल, कटर व स्क्रू ड्रायव्हर असा ९ लाख ९१ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांनी अशाच प्रकारचे गुन्हे येवला व गंगापूर येथे केल्याची कबुली दिली. मुख्य आरोपी संतोष जाधव आणि परमेश्वर भोसले यांच्यावर दरोडा, घरफोडी आणि चोरीचे गुन्हे दाखल आहे.
किराणा दुकानात शिरून पितापुत्रावर जीवघेणा हल्ला
अहिल्यानगर ः भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरदेवळे परिसरात एका तरुणाने किरकोळ कारणावरून किराणा दुकानदारासह त्यांच्या मुलाला लाकडी दांडके आणि फायटरने बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वैभव देविदास हजारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागरदेवळे येथील रहिवासी रोहीदास लक्ष्मण हराळे यांचे स्वतःच्या घराशेजारीच किराणा दुकान आहे. ३१ मार्च रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास हराळे हे दुकानात असताना आरोपी वैभव हजारे त्या ठिकाणी आला. कोणतीही पूर्वकल्पना नसताना आरोपीने हातातील लाकडी दांडके आणि फायटर या घातक हत्याराचा वापर करून रोहीदास हराळे यांच्यावर हल्ला चढवला. मध्यस्थी करण्यासाठी आलेला त्यांचा मुलगा बाळू हराळे यालाही आरोपीने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. पीडित वडिलांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
तरुणावर हल्ला
अहिल्यानगर: चिचोंडी पाटील येथे यात्रा उत्सवादरम्यान जुन्या भांडणाची कुरापत काढून एका तरुणावर विटेने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात आरोपी घनश्याम संतोष जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदित्य कैलास पाडेकर (वय २४, रा. चिचोंडी पाटील) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. आदित्य हे गावातील यात्रेसाठी गेले असता, त्या ठिकाणी आरोपी घनश्याम जाधव हा दारूच्या नशेत आला. त्याने आदित्य यांना जुन्या भांडणाचे कारणावरून अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आदित्य यांनी शिवीगाळ करण्यास विरोध केला असता, तू मला पाठीमागे शिवीगाळ आणि मारहाण केली होती, असे म्हणून आरोपीने संताप व्यक्त केला. या रागातून घनश्यामने तेथे पडलेली वीट उचलून आदित्य यांच्या डोयात जोरात मारली. या हल्ल्यात आदित्य यांच्या डोयाला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाला.










