नगरसेवकांकडे तक्रार करून उपयोग नाही
संगमनेर | नगर सह्याद्री
संगमनेर शहरातील प्रभाग क्रमांक 11 मध्ये एका रुग्णालयासमोर मोकाट जनावरांनी केलेल्या घाणीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी अस्वच्छता पसरल्याने रुग्ण, नातेवाईक तसेच स्थानिक नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
या प्रकारामुळे प्रभागातील नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या संतप्त प्रतिक्रिया नोंदवण्यास सुरुवात केली आहे. प्रभागातील समस्या सोडविण्यात नगरसेवक पूर्णपणे अपयशी ठरत आहेत, निवडून दिल्यानंतर जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे, नगरसेवकांकडे तक्रार करून देखील काही उपयोग नाही, अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
विशेषतः रुग्णालय परिसरात दुर्गंधी, घाणीचे साम्राज्य आणि मोकाट जनावरांचा वावर वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. संबंधित प्रशासनाने तसेच लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा आणि परिसराची स्वच्छता राखावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. या प्रभागाला खेटूनच कत्तल खाणे असल्यामुळे या प्रभागात मोकाट गाया, कुत्रे कायम फिरत असतात. रात्रीच्या वेळी तर कुत्र्यांचा हैदोस सुरू असतो. नागरिकांना बाहेर पडणे मुश्किल होते. शाळेला सुट्या असल्याकारणाने छोटी मुले बाहेर खेळायला घाबरत आहे. नगराध्यक्षा मैथिली तांबे आणि आमदार सत्यजित तांबे यांनी सुरू केलेल्या 2.0 नुसार काम करण्याची पद्धत अजून या 11 क्रमांक प्रभागातील नगरसेवकांच्या अंगी लागली नसल्याचे दिसून येत आहे. नगराध्यक्ष मैथिली तांबे यांनी लक्ष घालून याभागातील नगरसेवकांना कानपिचक्या देण्याची गरज असल्याचे दिसते.दरम्यान, नागरिकांच्या वाढत्या नाराजीमुळे प्रभागातील राजकीय वातावरणही तापण्याची चिन्हे दिसत आहेत.










