हवामान खात्याचा अंदाज, 6 जूनपर्यंत कोकणात तर 7 जूनपर्यंत पुण्यात
उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी दिलासा
मुंबई /नगर सहयाद्री :
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा नैऋत्य मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 26 मे रोजी मान्सून केरळ किनारपट्टीवर पोहोचू शकतो. यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुढील 48 तासांत दक्षिण अंदमान समुद्र, बंगालचा उपसागर आणि अंदमान-निकोबार बेटांमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. 16 मेच्या आसपास मान्सून अंदमान परिसरात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर 26 मे रोजी मान्सून केरळात दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. त्याचबरोबर ईशान्य भारत आणि दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी, आणि दक्षिण कर्नाटकात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
एकीकडे मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत असताना, दुसरीकडे उष्णतेची लाट कायम आहे. राजस्थानमधील बारमेर येथे देशातील सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
6 जूनपर्यंत कोकणात दाखल होण्याचा अंदाज
मान्सून 5 जूनपर्यंत गोव्यात दाखल होण्याची शक्यता असून 6 जूनपर्यंत तो कोकणात पोहोचू शकतो. तसेच 7 जूनपर्यंत पुण्यात मान्सून दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यंदा मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात कोणतेही चक्रीवादळ निर्माण झालेले नाही. त्यामुळे मान्सूनच्या प्रवासात कोणताही मोठा अडथळा येण्याची शक्यता कमी असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.










