घरगुती गॅस मिळेना | व्यावसायिक गॅसचा तुटवडा
नवी दिल्ली | वृत्तसंस्था
मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षामुळे जगातील तेल पुरवठा विस्कळीत झाला आहे. घरगुती गॅसच्या रुपाने स्वयंपाकघरातही याची झळ पोहोचली आहे. दरम्यान, घरगुती गॅसचा अखंड पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने मंगळवारी अत्यावश्यक वस्तू कायदा लागू केला आहे.
गेल्या ११ दिवसांपासून अमेरिका – इस्त्रायलने इराणविरोधात युद्ध छेडले आहे. यामुळे जगातील खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा जवळपास ठप्प झाला आहे. पुरवठा विस्कळीत झाल्याने महाराष्ट्रासह देशात याची घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकाराने देशात एस्मा कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या कायद्यामुळे देशात आवश्यक वस्तूंची साठवणूक आणि काळा बाजारास आळा बसणार आहे. दरम्यान, गॅसच्या संकटामुळे किचन आता संकटात येवू लागले आहे. घरगुती गॅससाठीही नागरिकांना प्रचंड कसरत करावी लागत आहे. त्यातच सरकारने सिलेंडर बुकिंगचा कालावधी वाढवल्याने लोकांमध्ये अधिकच गोंधळ पाहायला मिळतोय. त्यामुळे युद्ध जरी आखातात असलं तरी देशातील नागरिकांचं जेवणच संकटात आलंय.
काय आहे आदेश?
अधिकृत आदेशानुसार, केंद्र सरकारने रिफायनरीज आणि पेट्रोकेमिकल युनिट्सना द्रव पेट्रोलियम गॅस (एलपीजी) चे उत्पादन जास्तीत जास्त करण्याचे आणि प्रमुख हायड्रोकार्बन प्रवाह एलपीजीपूलमध्ये वळवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, विशिष्ट क्षेत्रांना नैसर्गिक वायूचा पुरवठा प्राधान्य वाटप म्हणून विचारात घेतला जाणार आहे.
…तर दोन दिवसांत सर्व रेस्टॉरंट बंद होतील
व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या अचानक आलेल्या संकटामुळे हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. जर पुरवठा पूर्ववत झाला नाही तर काही दिवसांतच रेस्टॉरंट बंद पडू शकतात, असा इशारा महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील रेस्टॉरंट संघटनांनी दिला आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील तीव्र संघर्षाचे पडसाद जगभरात उमटत आहेत. मुंबई आणि बेंगळुरूसारख्या मोठ्या शहरांमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावर आधीच परिणाम झाला आहे. इंडिया हॉटेल्स अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष विजय शेट्टी याविषयी म्हणाले, ही टंचाई वेगाने पसरतेय. जर परिस्थिती अशीच राहिली तर पुढील दोन दिवसांत मुंबईतील सर्व रेस्टॉरंट बंद होतील.










