- जाहिरात -spot_img

एमडी ड्रग्ज प्रकरणी तिघे ताब्यात, लाचखोरी भोवली, तरुणीवर अत्याचार, सायबर गुन्हेगारांचे जाळे उघडकीस कुठे काय घडलं

शेवगाव शेअर मार्केट घोटाळा: लाचखोरीप्रकरणी पोलीस अंमलदार दिनेश राठोड निलंबित; डीवायएसपी गणेश उगले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
​अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
शेवगाव येथील बहुचर्चित शेअर मार्केट घोटाळ्याच्या तपासात लाचखोरीचा प्रकार समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी आर्थिक गुन्हे शाखेचा पोलीस अंमलदार दिनेश राठोड याला चौकशीअंती तडकाफडकी निलंबित केले आहे. तर दुसरीकडे, या प्रकरणात नाव समोर आलेले उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) गणेश उगले यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागात गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी फिर्यादींनी केली आहे.

​शेवगाव येथील शेअर मार्केटमध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली होती. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. मात्र, तपास करताना फिर्यादी यशवंत पाटेकर यांनाच आरोपी करण्याची भीती दाखवून पैशांची मागणी करण्यात आली. अंमलदार दिनेश राठोड याने व्हॉट्सअॅप कॉल करून वरिष्ठांच्या नावाने लाच मागितल्याचा आरोप फिर्यादींनी केला आहे.
​दरम्यान, एका गाडीत बसून दोन लाख रुपयांची लाच स्वीकारल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत डीवायएसपी गणेश उगले यांच्या नावाचा उल्लेख असल्याने पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली आहे. त्यामुळे राठोड याच्या निलंबनानंतर आता गणेश उगले यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

इन्स्टाग्रामवर महिलेचा छळ करणारा तरुण गजाआड; सायबर पोलिसांची मोठी कारवाई
​अहिल्यानगर: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर बनावट खाते तयार करून एका विवाहित महिलेला अश्लील संदेश पाठवून त्रास देणाऱ्या आरोपीचा सायबर पोलिसांनी शोध घेतला आहे. मोबाईल क्रमांकाच्या आधारे तपास करत पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीचा पर्दाफाश केला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही आपल्या माहेरी राहत असताना तिने आपले इन्स्टाग्राम खाते उघडले. त्यावेळी तिला एका अज्ञात बनावट खात्यावरून अश्लील आणि किळसवाणे संदेश आल्याचे निदर्शनास आले. आरोपीने संवादादरम्यान अश्लील भाषेत मेसेज करून महिलेकडे अयोग्य मागण्या केल्या आणि तिचा मानसिक छळ केला. या प्रकारामुळे त्रासलेल्या महिलेने अखेर सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

​सायबर पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी संशयित खात्याची माहिती मिळवली. तपासादरम्यान हे बनावट खाते एका विशिष्ट मोबाईल क्रमांकावरून चालवले जात असल्याचे उघडकीस आले. या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी संबंधित मोबाईल क्रमांक धारकाविरोधात गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. सोशल मीडियावर महिलांची सुरक्षितता आणि सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडक पावले उचलली जात आहेत.

एमडी ड्रग्ज प्रकरण: आणखी तिघे तोफखाना पोलिसांकडून ताब्यात
अहिल्यानगर – मिस्कीन मळा येथे तोफखाना पोलिसांनी ३१ लाख रुपये किमतीचे १५४ ग्रॅम मेफेड्रोन पकडल्याच्या प्रकरणात स्थानिक पातळीवर मेफेड्रोनची विक्री करणाऱ्या आणखी तीन संशयितांना तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अली शकील शेख (वय १९ वर्षे, रा. गोविंदपुरा), दानिश फारुख शेख (वय २९ वर्षे, रा. जुना घासगल्ली, तांबटकर गल्ली) आणि कासिफ सज्जाद खान (वय २६ वर्षे, रा. जुना मुकुंदनगर) अशी तिघांची नावे आहेत. त्यांच्याकडे सखोल चौकशी सुरू असून, शहरातील ड्रग्जच्या स्थानिक वितरणाचे रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा :  महिला आरक्षणावरून राजकारण तापले, आरक्षण नव्हे, संरक्षण हवे

तोफखाना पोलिसांनी स्विफ्ट कारमधून जाणाऱ्या जिशान शौकत सय्यद, रिहान जावेद शेख (दोघे रा. मुकुंदनगर) आणि वसिम खलील बागवान (रा. पिंजार गल्ली) या तिघांना अटक करून मोठी कारवाई केली होती. त्यांच्याकडे खेळण्यातील पिस्तूल, चाकू व इतर साहित्यही सापडले होते. सध्या ते २४ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत आहेत. या कारवाईवेळी मुख्य संशयित जमीर निसार शेख हा कारमधून पळून गेला होता. जमीरनेच हे ड्रग्ज आणल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्याच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

दरम्यान, अटकेतील आरोपींच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी स्थानिक साखळीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. त्यातूनच वरील तीन नवीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

चाणक्य चौकातील झेरॉक्स दुकानावर चोरट्याचा डोळा; वृद्ध व्यापाऱ्याची ४० हजार रुपयांची सोन्याची अंगठी लंपास
​अहिल्यानगर: शहरातील बुरुडगाव रोडवरील चाणक्य चौक भागात असलेल्या सुपर झेरॉक्स दुकानात एका अज्ञात चोरट्याने हातचालाखी करून वृद्धाची सोन्याची अंगठी पळवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​रतीलाल भगवानदास गुगळे (वय ७८, रा. चाणक्य चौक, बुरुडगाव रोड, अहिल्यानगर) असे सोन्याची अंगठी चोरीस गेलेल्या वृद्ध व्यापाऱ्याचे नाव आहे. रतीलाल गुगळे हे मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास चाणक्य चौकातील सुपर झेरॉक्स दुकानात गेले होते. त्यावेळी तिथे आलेल्या एका अज्ञात चोरट्याने रतीलाल गुगळे यांची नजर चुकवून अतिशय हातचालाखीने त्यांच्या हातातील ४० हजार रुपये किंमतीची व १० ग्रॅम वजनाची चौकोनी आकाराची सोन्याची अंगठी चोरून नेली.

​आपली फसवणूक व चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर रतीलाल गुगळे यांनी लागलीच कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
​घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख आणि पोलीस उपनिरीक्षक अमीना शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार सोमनाथ केकाण हे करत आहेत. भरदिवसा झालेल्या या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

अहिल्यानगरमध्ये बंद घर फोडून १.५३ लाखांचा ऐवज लांबवला; अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल
​अहिल्यानगर: अहिल्यानगर शहरातील एकविरा चौक परिसरातील वृद्धेश्वर कॉलनीत बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने १ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याची घटना घडली आहे. यात रोख रकमेसह मौल्यवान सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे.

​याप्रकरणी फिर्यादी अविनाश नानासाहेब खाडे (वय ३५ वर्षे, व्यवसाय: खाजगी नोकरी, मूळ रा. लाख, ता. राहूरी, सध्या रा. एकविरा चौक, सांदीपनी Classes च्या मागे, वृद्धेश्वर कॉलनी, अहिल्यानगर) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दिनांक २० जुलै २०२६ रोजी सकाळी १०:०० ते २१ जुलै २०२६ रोजी सकाळी ९:०० च्या दरम्यान घडली. खाडे कुटुंबिय घराला कुलूप लावून बाहेर गेले असताना अज्ञात चोरट्याने मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील लॉकरमध्ये असलेल्या प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवलेली ४५ हजार रुपयांची रोख रक्कम आणि १ लाख ८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ५३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

हे सुद्धा वाचा :  टाकळी ढोकेश्वर परिसरात पाणीटंचाई; वाढीव पाणीटँकरची मागणी

​चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये सोन्याच्या चार बाळ्या, दोन सोन्याचे ओम, दोन सोन्याच्या साखळ्या आणि सोन्या-काळ्या मण्यांच्या चार मनगट्यांचा समावेश आहे. ​घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ), ३३१ (३) व ३३१ (४) नुसार गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील करत आहेत.

सायबर गुन्हेगारांचे अहिल्यानगरमधील जाळे उघडकीस; ४० लाखांच्या फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल
​अहिल्यानगर – देशभरातील नागरिकांची सायबर फसवणूक करून मिळवलेली रक्कम अहिल्यानगर जिल्ह्यातील बँक खात्यांमधून परस्पर काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात चाळीस लाख अडुसष्ठ हजार रुपयांहून अधिक रकमेच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार अमोल नवनाथ आव्हाड यांनी या प्रकरणी कायदेशीर फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून फसवणुकीची रक्कम स्वतःच्या बँक खात्यात मागवून ती काढून घेणारे अज्ञात खातेधारक, खाती हाताळणारे इसम आणि त्यांचे मुख्य साथीदार यांच्याविरोधात कट रचून संघटित फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ ऑगस्ट २०२५ ते ७ एप्रिल २०२६ या कालावधीत सायबर भामट्यांनी देशभरातील अनेक नागरिकांना जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक केली. या फसवणुकीतून मिळालेली एकूण ४० लाख ६८ हजार ५६९ रुपये ४५ पैसे इतकी रक्कम अहिल्यानगर जिल्ह्यातील काही बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आली होती.

​रक्कम खात्यात जमा होताच यातील खातेदारांनी आणि खाती हाताळणाऱ्या स्थानिक हस्तकांनी तात्काळ चेक आणि एटीएमद्वारे सर्व पैसे स्वतःच्या फायद्यासाठी काढून घेतले. सायबर गुन्हेगारांशी संगनमत करून आणि कट रचून नागरिकांची आर्थिक लूट केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
​या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सागर ढिकले हे करत असून, संशयित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

भिंगारमध्ये महिलेची छेडछाड करून जीवे मारण्याची धमकी; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
बेरड गल्लीतील घटना : कॅम्प पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा नोंद
​अहिल्यानगर – भिंगार परिसरातील बेरड गल्ली येथे एका ४४ वर्षीय महिलेचा हात धरून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत, वाईट शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २१ जुलै) सकाळी पावणेआठच्या सुमारास बेरड गल्ली, भिंगार येथे ही घटना घडली. पीडित महिला आणि साक्षीदार उपस्थित असताना आरोपींनी त्यांना विनाकारण अश्लील व वाईट शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपींनी पीडित महिलेचा हात जबरदस्तीने पकडून तिला स्वतःच्या जवळ ओढले व तिची छेडछाड करून मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

​या प्रकरणी पीडित महिलेने कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सनि शंकर निकाळजे (रा. भीम नगर, भिंगार), अभिलेख धर्मेंद्र वाघेला (रा. नेहरू नगर, भिंगार) आणि शरद दत्तात्रय थोरात (रा. खळेवाडी, भिंगार) या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ३५१(२), (३), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा :  चौघांनी मजुराला लुटले, तरुणावर जीवघेणा हल्ला, अवैध धंद्यांवर छापेमारी, कुठे काय घडलं पहा

​घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बापू म्हस्के करत आहेत.

फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीवर अत्याचार; संशयित आरोपी फरहान शेखविरुद्ध गुन्हा दाखल
​अहिल्यानगर: मोबाईलमधील फोटो आई-वडिलांना पाठवण्याची आणि सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन एका १८ वर्षीय तरुणीवर वारंवार शारीरिक अत्याचार केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फरहान सादीक शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मार्च २०२६ ते जुलै २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला. संशयित आरोपी फरहान सादीक शेख (रा. वांबोरी, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) याने पीडित तरुणीला अहिल्यानगर तालुक्यातील डोंगरगण परिसरात नेले. तेथे तिचे मोबाईलमध्ये फोटो काढून, ते फोटो कुटुंबाला पाठवण्याची व इंटरनेटवर टाकण्याची धमकी दिली.

​या भीतीपोटी तरुणीने शांत राहणे पसंत केले, मात्र आरोपीने या धमकीचा गैरफायदा घेत तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध ठेवले. अखेर या जाचाला कंटाळून पीडित तरुणीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
​या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक थोरात करत आहेत.

जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला; पंचपीर चावडी परिसरातील पाच जणांवर गुन्हा दाखल
​अहिल्यानगर – शहर परिसरातील टिळक रोड ते नांगरे गल्ली भागात जुन्या वादाच्या कारणावरून एका २४ वर्षीय तरुणावर लोखंडी फायटर, धारदार शस्त्र आणि लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, अहमद अली जहूर अहमद शेख (वय २१, रा. जुना बाजार माळीवाडा, अहिल्यानगर) हे १९ जुलै रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास नांगरे गल्ली येथून पायी जात होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून आलेल्या आरोपींनी त्यांना अडवून अचानक शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपी जैद शेख याने हातातील धारदार वस्तूने अहमद अली यांच्या डोक्यावर वार केला.

​त्याच वेळी मोईज शेख आणि खलील शेख यांनी लोखंडी फायटरने मारहाण केली, तर अनिस शेख आणि अरबाज या दोघांनी लाकडी दांडक्याने पाठीवर व पायावर जबर मारहाण केली. या हल्ल्यात अहमद अली हे गंभीर जखमी होऊन खाली पडले.
​घटनेनंतर परिसरातील नागरिक गोळा झाल्यावर आरोपींनी जीवे मारण्याची धमकी देऊन तेथून पळ काढला. जखमी तरुणावर उपचारासाठी शहरातील हार्टबीट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ​त्यांच्या उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून कोतवाली पोलिसांनी दि. २१ जुलै रोजी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल वसीम पठाण करत आहेत.

Follow us:

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Follow us on

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ

आमच्याविषयी

राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला. सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवणारी पत्रकारीता करीत असताना रोखठोक आणि आक्रमक पत्रकारीता ही ‘नगर सह्याद्री’ची ओळख! ‘नगर सह्याद्री’ वाचला जातो तो वेगळ्या वैचारिक लिखाणासाठी! आम्ही परखड विचारांचा ‘सारिपाट’ मांडतो त्यासाठीच! लाळघोटणारी पत्रकारीता ‘नगर सह्याद्री’च्या टीमने कधी केली नाही आणि करणार पण नाही!

अहिल्यानगर कार्यालय

कुंदन नगरी अपार्टमेंट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, माळीवाडा अहमदनगर महाराष्ट्र ४१४००१

© 2026 Nagarsahyadri.com