नगरसेवकांंचा सर्वसाधारण सभेवर बहिष्कार
श्रीगोंदा | नगर सह्याद्री
श्रीगोंदे नगरपालिकेच्यासर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभाराचे दर्शन घडल्याचा आरोप करत शिवसेनेने जोरदार आक्रमक पवित्रा घेतला आहे. शहरातील जनतेच्या हिताचे विविध महत्त्वाचे प्रश्न सभेत घेण्याची विनंती शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली होती. मात्र लोकहिताचा विचार न करता हे विषय सभेत घेण्यास नकार देण्यात आल्याने शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करत सर्वंसाधारण सभेवर बहिष्कार टाकला.
श्रीगोंदे शहरातून जाणाऱ्या कल्याण हायवेचे रखडलेले काम हा शहरातील नागरिक, व्यापारी आणि वाहन चालकांसाठी डोकेदुखीचा विषय बनला आहे. उखडलेले रस्ते, उडणारी धूळ, वाहतूक कोंडी आणि अपघातांची वाढती संख्या यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. या गंभीर प्रश्नांवर संबंधित ठेकेदाराला सभेत बोलावून जाब विचारण्यात यावा, अशी मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. मात्र प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी या प्रश्नांकडेही दुर्लक्ष केल्याचा आरोप शिवसेनेने केला.
या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ शिवसेनेचे नेते व माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या सर्व 9 नगरसेवकांनी आंदोलनाचा पवित्रा घेत सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकला.
यामध्ये अँड. सुशीलकुमार शिंदे, बाबुशेठ धुमाळ, अँड. दिपाली बोरुडे, भामाबाई कोथिंबीरे, अनिल औटी, बंटी बोरुडे, पल्लवी पोटे, अत्तर शेख, सुनीता औटी तसेच दादा औटी, सोनू कोथिंबीरे आणि नंदकुमार ताडे यांनी सहभागी होत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करून बहिष्कार टाकला.
शिवसेना पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा देत म्हटले की, श्रीगोंदे शहरातील जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी आणि विकासासाठी आम्ही रक्ताचे पाणी करून संघर्ष करण्यास तयार आहोत. आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे शिवसैनिक आहोत. जनतेच्या प्रश्नांवर कुणीही आम्हाला हलक्यात घेण्याची चूक करू नये. संघर्ष हा शिवसैनिकांच्या रक्तात आहे आणि जनहितासाठी आमचा लढा यापुढे आणखी तीव्र करण्यात येईल. जनतेचे प्रश्न दाबण्याचा प्रयत्न झाला, तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही शिवसेनेच्या नगरसेवकांनी दिला.










