काँग्रेस आक्रमक, थेट अटकेची मागणी
नागपूर | नगर सह्याद्री
बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी नागपुरात एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले द आहे. देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवराज यांच्यावर अभद्र टिप्पणी केल्यानंतर धीरेंद्र शास्त्रींविरोधात सोशल मीडियात संतापाचा उद्रेक झाला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करून थकले व ते रामदास स्वामींकडे गेले. आता मला जास्त लढायचे नाही व हे मुकूट व सत्ता तुम्ही सांभाळा, असे ते त्यांना म्हणाले असल्याचा दावा बागेश्वर महाराज यांनी केला. श्री आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्थेद्वारा प्रस्तावित भारतदुर्गा शक्ती स्थळाचा जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या परिसरात शिलान्यास सोहळ्यादरम्यान ते बोलत होते. यावरून अनेक नेतेमंडळी संताप व्यक्त केला. धीरेंद्रशास्त्री महाराज याआधीही त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आले होते. त्यावेळी त्यांना माफीही मागावी लागली आहे. आता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकल्याचं विधान केलंय. शिवरायांनी समर्थ रामदासांकडे राजपाट सांभाळण्यासाठी दिला, असं विधान बागेश्वर बाबाने केलंय. नागपूरमध्ये भारत दुर्गा मंदिर या कार्यक्रमात ते बोलत होते.
बागेश्वर धामचे धीरेंद्रशास्त्री म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी युद्ध करता करता थकले. त्यावेळी एक दिवस ते स्वामी समर्थ रामदासांकडे गेले आणि म्हणाले की आम्ही खूप युद्ध लढली. आता कृपा करा की आम्हाला युद्ध करायची नाही. दया करा, राजपाट सांभाळा. तुमच्या आज्ञेनेच आम्ही चाललो पण आता होत नाहीय. आता आराम हवाय. काही दिवस काही करायचं नाहीय असं विधान बागेश्वर बाबांनी म्हटलंय.
इतिहासात अशा प्रकारचा कुठलाच दाखला मिळत नाही ः मुख्यमंत्री
बागेश्वर बाबांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले की, इतिहासात अशा प्रकारचा कुठलाच दाखला आपल्याला पाहायला मिळत नाही. महापुरुषांबद्दल अनेक लोककथा तयार होतात, वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रकारच्या लोककथा असतात. रामायण आणि महाभारताबाबतही अनेक लोककथा आहेत. इतिहासावर किंवा परिस्थितीवर अवलंबून त्या लोककथा तयार होत असतात. मी एवढेच म्हणेल की, जो इतिहास आपण शिकलो आहे किंवा आपल्या इथे जे काही ग्रंथ उपलब्ध आहेत, त्यात अशा प्रकारचा कुठलाही दाखला नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.
काय म्हणाले बागेश्वर बाबा?
कार्यक्रमात बोलताना बागेश्वर बाबांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या भेटीचा एक प्रसंग सांगितला. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा युद्ध करता करता थकले, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं की आता आपण थकलोय, तेव्हा एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामी यांच्याकडे गेले आणि आपले मुकुट काढले व सांगितले की, मी अनेक लढाई लढलो, अनेक युद्ध केले, पण आता पुढे लढायचे नाहीय. तुम्ही एक दया करा की, हे मुकुट तुम्हा आता सांभाळा, हे राज्य सांभाळा…तुमच्या आदेशानेच आम्ही चाललो, मात्र आता आमच्याकडून युद्ध लढले जात नाहीय. आता आम्हाला विश्राम हवा आहे. काही दिवस आम्हाला काहीच करायचे नाहीय. यावर हसत रामदास स्वामी म्हणाले की, ठीकंय…मी स्वीकार करतो. पण एक गोष्ट मला सांगायची आहे की, तुम्ही माझे कोण आहात?, यावर छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, मी तुमचा शिष्य आहे. रामदास स्वामी म्हणाले, मी कोण आहे?, यावर छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, तुम्ही आमचे गुरु आहात. मग रामदास स्वामींनी विचारलं, मग शिष्यचं कर्तव्य काय?, यावर शिवराय म्हणाले, जे गुरु आदेश देतील. यानंतर रामदास स्वामींनी मुकुट उचलून छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोयावर घातलं आणि म्हणाले, आजपासून माझं राज्य आहे, मी चालवणार…पण आज्ञा तुम्हाला आहे, तुम्हाला संचालन करायचं आहे, असा छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांचा किस्सा बागेश्वर महाराज यांनी सांगितला.
भोंदू बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घालावी ः आमदार रोहित पवार
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या या वक्तव्याचा महाराष्ट्रात विरोध सुरु झाला आहे. शिवराय थकले आणि राजपाट समर्थांकडं दिला, हे तथाकथित बागेश्वर नामक भोंदूचं वक्तव्य अत्यंत संतापजनक आहे. यापूर्वीही या भोंदूसह त्याच्या काही सहकार्यांनी जगद्गुरु संत तुकोबाराय, संत ज्ञानेश्वर माऊली आणि एकूणच संत परंपरेसंदर्भात गरळ ओकली होती असं रोहित पवार म्हणाले. भोंदू बागेश्वरकडून शिवछत्रपतींचा अवमान होत असताना राज्यकर्तेही त्या स्टेजवर होते याचं जास्त दुःख वाटतं. शिवछत्रपतींचा अवमान करणार्या भोंदू बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घालावी. हा भोंदू यापुढं महाराष्ट्रात दिसता कामा नये, अन्यथा भोंदू बागेश्वरसह सरकारलाही महागात पडेल असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.










