अहिल्यानगर | नगर सह्याद्री
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपिटीने शेतपिकांचे नुकसान झाले आहे. काढणीस आलेला गहू, हरभरा, कांदा पिके भुईसपाट झाली असून, द्राक्ष, आंबा, टरबूज, डाळिंब या फळपिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील राहुरी, नेवासा, राहाता, अकोले, नगर, पाथर्डी व पारनेर तालुक्यातील रब्बी पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. या पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी शेतकर्यांनी केली आहे.
करंजी, लोहसरसह परिसरात गारांचा पाऊस
अनेक शेतकर्यांचा गहू भिजून नुकसान
पाथर्डी | नगर सह्याद्री
पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भागातील करंजीसह परिसरातील लोहसर, खांडगाव, भोसे, सातवड, घाटसिरस, जोहारवाडीसह अनेक गावात आज वादळी वार्यासह गारांचा पाऊस झाला. या पावसाने अनेक शेतकर्यांचा गहू शेतातच असल्याने तो भिजून मोठे नुकसान झाले.

आज दुपारी दोनच्या सुमारास पाथर्डी तालुयातील पश्चिम भागातील करंजीसह लोहसर, खांडगाव, भोसे, सातवड, घाटसिरससह अनेक गावात मेघगर्जनेसह गारांचा पाऊस झाला. काही भागात मोठ्या प्रमाणात तर काही भागात कमी प्रमाणात गारा पडल्या. या भागातील अनेक शेतकर्यांचा गहू अजुनही शेतात पडून आहे. अचानक आलेल्या या पावसाने गहू भिजुन मोठे नुकसान झाले. या भागात मोठ्या प्रमाणात असलेल्या फळबागांचेही नुकसान झाले. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमधुन शेतकरी अजुन सावरला नाही तोच हे दुसरे संकट आज शेतकर्यासमोर उभे राहिले. दुपारी दोन वाजता सुरू झालेला पाऊस चार वाजेपर्यंत कमी-अधिक प्रमाणात चालूच होता.
निघोज परिसरात अवकाळीने नुकसान
निघोज | नगर सह्याद्री
निघोजसह परिसरात गुरुवारी दुपारच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात वादळी वार्यासह गारांचा पाऊस झाल्याने निघोज परिसरातील शेतकर्यांचा शेतीमाल व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, तातडीने सरसकट पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी जनतेतून करण्यात आली आहे.

सध्या गहू, कांदा काढणी सुरू असल्याने कांदा व गहू काढून शेतातच तसाच ठेवला आहे. अचानक वादळी वार्यासह गारा पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच शिवडी, शिववाडी, मोरवाडी, रसाळवाडी, वडनेर, वडगाव गुंड या भागात फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जवळपास शेकडो शेतकर्यांना या नुकसानीचा फटका बसला असून सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहेपारनेर तालुयात सर्वाधिक गारांचा पाऊस मोठ्या प्रमाणात निघोज परिसरात झाला असल्याची माहिती शेतकर्यांनी आमदार दाते यांना दिली आहे. दाते यांनी नगर तालुयातील नांदगाव शिंगवे भागात पिकांची पाहणी केली आहे. तसेच पंचनामे करण्याच्या सूचना अधिकार्यांना दिल्या आहे. निघोज परिसरात शेतकर्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसानी झाल्या असून तातडीने सरसकट पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी जनतेतून होत आहे.
ढवळपुरी, धोत्रे, वनकुटे, निघोज परिसरात गारपीट
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर तालुयातील ढवळपुरी, वनकुटे, धोत्रे, पळशी, वासुंदे आणि वडगाव सावताळ, निघोज परिसरात गुरुवारी सायंकाळी सुमारे पाच वाजेच्या सुमारास वादळी वार्यासह जोरदार गारपीट आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अचानक आलेल्या वादळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसला असून, शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या गारपिटीमुळे काढणीसाठी तयार असलेले कांदा, गहू, टोमॅटो, हरभरा, वाटाणा यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच आंबा, कलिंगड, पेरू या फळबागांनाही गारपिटीचा विपरीत परिणाम झाला आहे. शेतात काढून ठेवलेला कांदा, गहू आणि हरभरा यांसारख्या पिकांना गारांचा थेट फटका बसला. पावसामुळे भिजलेला शेतमाल ठेवणे अशय झाल्याने शेतकर्यांना तो तत्काळ विक्रीसाठी बाजारपेठेत न्यावा लागणार आहे.शेतीमालाला सध्याच्या बाजारात योग्यभाव मिळत नसल्याने शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यातच हा अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. कांदा उत्पादक शेतकर्यांनी सांगितले की, भिजलेला माल जास्त काळ ठेवता येत नाही, त्यामुळे नाईलाजाने कमी दरात विक्री करावी लागणार आहे.या घटनेमुळे तालुयातील शेतकर्यांच्या आर्थिक स्थितीवर आणखी ताण आला असून, सरकारकडून तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. वातावरणातील गारठा काही काळ टिकून राहिल्याने शेतकर्यांची चिंता आणखी वाढली आहे.
शेतकर्यांवर आता उपासमारीची वेळ
गारपीटसदृश्य पावसाने आमच्या पेरू, कलिंगड, पपई आणि आंबा फळबागांना तसेच कांदा, हरभरा, गहू या पिकांना जबरदस्त फटका बसला. ढवळपुरी-धोत्रे परिसरात चांगलाच पाऊस झाल्याने फळे जमिनीवर पडून मोडली, काही झाडांनचे मोठे नुकसान झाले. हाता-तोंडाशी आलेले उत्पन्न हिरावले गेले. शेतीमालाला भाव नाही, त्यात हे संकट. सरकारने तातडीने पंचनामा करून भरपाई द्यावी, अन्यथा शेतकर्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे. शरद गवते, शेतकरी, धोत्रे
पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात
अचानक झालेल्या गारपीटग्रस्त पावसामुळे ढवळपुरी परिसरातील कांदा, गहू, हरभरा, पेरू, कलिंगड, आंबा यांसारख्या पिकांचे आणि फळबागांचे प्रचंड नुकसान झाले. हातातोंडाशी आलेले उत्पन्न हिरावले गेले. काही भागात शेतकर्याची शेती उद्ध्वस्त झाली आहे. प्रशासनाने तत्काळ सरसकट पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकर्यांना शासनाकडून योग्य नुकसान भरपाई लगेच द्यावी.अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. भागाजी गावडे, चेअरमन, सेवा सोसायटी, ढवळपुरी










