बांबूवर लोंबकळताहेत वीजतारा ! महावितरणच्या दुर्लक्षाने अपघाताचा धोका
पारनेर | नगर सह्याद्री
ग्रामीण भागातील शेता शिवारात महावितरणच्या ढिसाळ कारभाराचा एक धक्कादायक आणि जीवघेणा प्रकार समोर आला आहे. पारनेर तालुक्यातील मांडओहोळ परिसरात एका मुख्य कच्च्या रस्त्याच्या कडेला चक्क बांबूच्या साहाय्याने विजेच्या जिवंत तारा ताणून नेण्यात आल्या आहेत. हा बांबू अत्यंत धोकादायक पद्धतीने रस्त्यावर झुकला असून, यामुळे कधीही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शेतातील विहिरीला किंवा पंपांना वीजपुरवठा करण्यासाठी अनेकदा असे तात्पुरते आणि धोकादायक जुगाड केले जातात. परंतु, अधिकृत खांबांऐवजी वापरलेला हा बांबू वजनाने व वाऱ्याने कधीही मोडून पडू शकतो. सध्या हा बांबू रस्त्याच्या बाजूला आणि शेताच्या अगदी तोंडावर झुकलेला स्पष्ट दिसत आहे. ठिणग्या आणि शॉर्ट सर्किटचा मोठा धोका हा शेतकरी आणि ग्रामस्थांच्या दळणवळणाचा मुख्य मार्ग आहे. तसेच शेजारील विजेचा सिमेंटचा पोल देखील धोकादायक पद्धतीने एका बाजूने झुकलेला दिसत आहे. पावसाळ्यात किंवा दमट हवामानात या बांबूमधून वीज उतरण्याचा थेट धोका असतो. तसेच वाऱ्यामुळे या उघड्या तारा एकमेकांना घासून ठिणग्या पडल्यास, आजूबाजूच्या पिकाला भीषण आग लागून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होऊ शकते. एखादे मोठे वाहन किंवा ट्रॅक्टर येथून जाताना या तारांना स्पर्श झाल्यास निष्पाप नागरिकांचा जीव जाऊ शकतो.
ग्रामस्थांचा संताप; महावितरण ढिम्म!
आम्ही अनेकदा वीज मंडळाकडे अधिकृत खांब आणि सुरक्षित केबल टाकण्यासाठी विनंती केली आहे, परंतु प्रशासनाला जाग येत नाही. उद्या एखादा अपघात झाला तर याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल स्थानिक ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
शेतकऱ्यांना सोबत घेऊन जनआंदोलन छेडणार
महावितरणने शेतकऱ्यांच्या आणि निष्पाप नागरिकांच्या जीवाशी खेळणे त्वरित थांबवावे. रस्त्यावर झुकलेला हा धोकादायक बांबू तत्काळ हटवून त्याजागी पक्के लोखंडी किंवा सिमेंटचे खांब उभे करावेत. प्रशासनाने ही मागणी गांभीर्याने न घेतल्यास, महावितरणच्या कार्यालयावर शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल. या ढिसाळ कारभारामुळे उद्या जर कोणतीही जीवितहानी किंवा दुर्घटना घडली, तर त्याला सर्वस्वी महावितरणचे अधिकारीच जबाबदार राहतील.
रविंद्र राजदेव, राष्ट्रवादीचे नेते










