भिंगार कॅम्प पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
नगर-जामखेड रस्त्यावरील वृंदावन मंगल कार्यालयासमोर पहाटेच्या सुमारास एका कोळसा व्यापार्याला अडवून शिवीगाळ व मारहाण करत लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी विजय बंडू लालघोडे (वय ४८, रा. कुसगाव, मावळ, सध्या रा. कुई, सोलापूर) हे शेती आणि कोळसा विक्रीचा व्यवसाय करतात. घटनेच्या दिवशी पहाटे पावणेचार वाजेच्या सुमारास ते नगर-जामखेड रस्त्यावरून पिकअप जीपमधून जात होते. यावेळी निंबोडी परिसरात वृंदावन मंगल कार्यालयासमोर आरोपी महादेव (पूर्ण नाव माहीत नाही) आणि त्याच्यासोबत असलेल्या इतर दोन अनोळखी इसमांनी फिर्यादीला रस्त्यात अडवले.
आरोपींनी जुन्या वादातून किंवा पैशांच्या कारणावरून फिर्यादी विजय लालघोडे यांना बेदम मारहाण केली. आरोपींनी त्यांना रस्त्यावर गाठून शिवीगाळ व दमदाटी करत चापटीने मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या जवळील ५४ हजार ४७० रुपये किमतीचा २ हजार ९५ किलो तयार कोळसा, २५ हजार रुपयांची रोख रक्कम आणि गळ्यातील १५ हजार रुपये किमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन असा एकूण ९४ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने काढून घेतला आणि आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.या घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलिसांनी तातडीने पावले उचलली. घटनेचे गांभीर्य ओळखून तपास पथकासह श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मुलगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश पवार पुढील तपास करत आहेत.
पूर्ववैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला; तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील बिशप लॉईड कॉलनी मकासरे लब समोर पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर लोखंडी पाईप आणि धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जय रवी खरात (वय २७, व्यवसाय- फायनान्स, रा. बिशप लॉईड कॉलनी, अहिल्यानगर) हा तरुण आपल्या घरात असताना मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपी प्रविण मधुकर सोनवणे याने जय खरात याला गाठले. आरोपीने लोखंडी पाईपने जय याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच धारदार शस्त्राने वार करून त्याला गंभीर दुखापत केली.
हा वाद सोडवण्यासाठी जखमी तरुणाची पत्नी मध्यस्थी करण्यासाठी आली असता, आरोपीने तिला शिवीगाळ केली. तसेच तुम्हाला जिवंत मारून टाकीन, अशी धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली. या झटापटीत आरोपीने फिर्यादीचा मोबाईल हिसकावून त्याचे मोठे नुकसान केले. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून जखमीला तातडीने अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे. सी. भांबळ यांनी सहकार्यांसह घटनास्थळाची पाहणी केली. जखमी जय खरात याने दिलेल्या तक्रारीवरून तोफखाना पोलिसांनी आरोपी प्रविण सोनवणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार दीपक गांगर्डे आणि प्रवीण पांडागळे करत आहेत.
पानटपरी फोडून ४५ हजारांचा मुद्देमाल लंपास
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील सोलापूर रस्त्यावरील वाकोडी फाटा येथे असणारी एक पानटपरी अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री फोडल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी टपरीचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि रोख रकमेसह महागड्या सिगारेटचे बॉस असा एकूण ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाकोडी फाटा येथील रहिवासी कौस्तुभ बाळासाहेब राहिंज यांची सोलापूर रोडवर राजमाता पानटपरी नावाचे दुकान आहे. २४ मे रोजी पहाटे दोन ते तीन वाजेच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी या बंद टपरीचे कुलूप तोडले. चोरट्यांनी टपरीत ठेवलेली २० हजार रुपयांची रोकड आणि २५ हजार रुपये किमतीच्या विविध नामांकित कंपन्यांच्या सिगारेट असा एकूण ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल फिर्यादीच्या संमतीशिवाय स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चोरून नेला. २५ मे रोजी कौस्तुभ राहिंज यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात जाऊन या चोरीबाबत फिर्याद दिली. फिर्यादीने उशिरा तक्रार दिल्यामुळे गुन्हा दाखल करण्यास विलंब झाला.
या घटनेची माहिती मिळताच कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुलगीर आणि पोलीस हवालदार डी. बी. पालवे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपासादरम्यान फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी पोलीस हवालदार आय. आय. पठाण यांच्याकडे पुढील तपास सोपवण्यात आला असून, पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन्ही अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत.
दारू, जुगार अड्ड्यांवर एलसीबीची छापेमारी
अहिल्यानगर : जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत १० अवैध दारू विक्रेत्यांवर तसेच एका जुगार अड्ड्यावर धाड टाकली. या कारवाईत एकूण ७६ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ११ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार आणि पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली २४ आणि २५ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेची ४ विशेष पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी श्रीगोंदा, लोणी, राहुरी, बेलवंडी, कोपरगाव तालुका आणि नेवासा परिसरात अवैध दारू विक्री तसेच जुगार अड्ड्यांची माहिती काढून ११ ठिकाणी छापेमारी केली. कारवाईदरम्यान श्रीगोंदा येथे ३, लोणी येथे ३, राहुरी येथे २, बेलवंडी येथे १, कोपरगाव तालुयात १ आणि नेवासा येथे जुगार प्रकरणी १ असा एकूण ११ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये बेलवंडी पोलीस ठाणे हद्दीत सर्वाधिक ३७ हजार ७३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर कोपरगाव तालुयात २० हजार २५५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दारू, जेवणासाठी पैसे न दिल्याने हल्ला
अहिल्यानगर: घरी जात असलेल्या एका तरुणाला रस्त्यात अडवून दारू व जेवणासाठी पैशांची मागणी करण्यात आली. पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपींनी तरुणाला डोयात मारून गंभीर जखमी केले, तसेच बेल्टने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप देवलाल प्रसाद (वय २८, रा. कातोरे वस्ती, अहिल्यानगर) हे आपल्या घरी जात होते. दरम्यान, म्हस्के कॉलेजजवळील रस्त्यावर निखिल चंद्रकांत बोरकर (रा. बोल्हेगाव, अहिल्यानगर), यश सुनील धांग (रा. पितळे कॉलनी, एमआयडीसी) आणि इतर दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना रस्त्यात अडवले. आरोपींनी फिर्यादीकडे दारू पिण्यासाठी आणि जेवणासाठी पैशांची मागणी केली. फिर्यादीने पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. या रागातून आरोपी निखिल याने फिर्यादीच्या डोयात मारून त्यांना जखमी केले आणि तुझ्याकडे पाहून घेतो अशी धमकी दिली.










