पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण, टँकर सुरू करण्याची तहसीलदारांकडे मागणी
जामखेड | नगर सह्याद्री –
तालुक्यातील नान्नज गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना मोठी भटकंती करावी लागत आहे. गावातील विहिरी, बोअरवेल आणि इतर नैसर्गिक पाणीस्रोत पूर्णपणे कोरडे पडल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या गंभीर परिस्थितीमुळे ग्रामस्थांच्यावतीने जामखेडचे नायब तहसीलदार मच्छिंद्र पाडळे यांना निवेदन देऊन तातडीने पाण्याचा टँकर सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी भाजप तालुका उपाध्यक्ष उदयसिंह पवार, ओबीसी मोर्चाचे मेजर प्रकाश राऊत, मेजर चंद्रकांत साळवे, ॲड. अतुल सरवदे, हरी बोराडे, कितकुमार साळवे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
नान्नज गावाला धोंडपारगाव येथील तलावातून पाणीपुरवठा केला जातो.
मात्र सध्या तलावातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने गावाचा नियमित पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. परिणामी गावातील अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना पाण्यासाठी दिवसेंदिवस संघर्ष करावा लागत आहे.उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. विशेषतः महिला भगिनींना आणि ज्येष्ठ नागरिकांना दूरवर जाऊन पाणी आणावे लागत असून त्यांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. अनेक ठिकाणी नागरिकांना पाण्यासाठी रात्रभर जागरण करावे लागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गावातील जनावरे व पशुधनासाठीही पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
दरम्यान, अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने विविध आजारांचा धोका वाढण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाने तात्काळ उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांकडून देण्यात येत आहे.तहसील प्रशासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन नान्नज गावासाठी तातडीने पाण्याचा टँकर सुरू करावा व नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.
धोंडपारगाव तलावाने गाठला तळ
जामखेड तालुक्यातील नान्नज, झिक्री, धोंडपारगाव, पाडळी, राजेवाडी, खुरदैठण, खांडवी व गुरेवाडी या आठ गावांना धोंडपारगाव येथील तलावातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तलावाने तळ गाठल्याने या गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विस्कळीत झाला असून महिलांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवा
नान्नजसह परिसरातील गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने टँकर सुरू करावेत. तसेच या गावांच्या कायमस्वरूपी पाणीप्रश्नासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे,
-उदयसिंह पवार, तालुका उपाध्यक्ष, भाजप, जामखेड










