राहुरी | नगर सह्याद्री
शेतकऱ्यांचा उतारा कोरा करण्याचे आश्वासन देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या दोन दिवसांत राज्यातील शेतकरयांना सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर शेतकऱ्यांना घेऊन धडकणार असल्याचा इशारा शिवसेनेच्या (शिंदे गट) शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दिला.
राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्यासमोर नगर-मनमाड महामार्गावर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणे, ऊस बिलाची थकबाकी अदा करणे, कृषी वीजपुरवठा सुरळीत करण्यासह विविध प्रश्नांवर शेतकरी सेनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. नायब तहसीलदार यांना संघटनेच्या वतीने मागण्याचे निवेदन देण्यात आले
यावेळी शिवसेना शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी राज्य सरकारवर खरपूस टीका केली. शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव मिळत असून, राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. यावेळी राजेंद्र लोंढे, प्रकाश देठे, संतोष चोळके, बाळासाहेब जाधव, किरण कडू आदीनी मनोगत व्यक्त केले.या आंदोलनप्रसंगी धनंजय लहारे, सुनील इंगळे, सतीश पवार, सुनील आढाव, सचिन म्हसे, प्रमोद पवार, रवीकिरण ढुस आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस निरीक्षक विजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.










