अहिल्यानगर | नगर सह्याद्री
नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिचोंडी पाटील शिवारात दोन अनोळखी इसमांनी भरदिवसा धुमाकूळ घालत एका ज्येष्ठ महिलेला आणि त्यांच्या सुनेला बेदम मारहाण करून सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चिचोंडी पाटील शिवारातील शेत गट क्रमांक ८०४ मध्ये पिंपळा जाणारे रस्त्याजवळ फिर्यादी आणि त्यांची सून काम करत होत्या. दुपारी एक वाजेच्या सुमारास दुचाकीवरून दोन अनोळखी व्यक्ती त्या ठिकाणी आल्या. या दोघांनी अचानक फिर्यादी महिलेवर लाकडी काठीने हल्ला चढवला, तसेच त्यांच्या सुनेलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादींच्या दोन्ही कानांना आणि डाव्या पायाला गंभीर जखम झाली आहे.या मारहाणीनंतर आरोपींनी फिर्यादींच्या कानातील सोन्याची कर्णफुले, गळ्यातील सोन्याचे मणी असलेली पोत आणि त्यांच्या सुनेच्या गळ्यातील सोन्याचे मणीमंगळसूत्र असा एकूण ७८ हजार रुपये किमतीचा ऐवज बळजबरीने ओरबाडून नेला. दागिने लुटल्यानंतर आरोपी दुचाकीवरून पिंपळा गावाच्या दिशेने फरार झाले. जखमींवर स्थानिक खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे करत आहेत.
माळीवाडा परिसरात अन्न व औषध प्रशासनाची छापेमारी
तीन विक्रेते पोलिसांच्या जाळ्यात | मुद्देमाल जप्त
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
राज्य शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूच्या विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने अखेर मोठी कारवाई केली आहे. शहरातील माळीवाडा बस स्थानक परिसर आणि आशा चित्रपटगृहाच्या मागे असलेल्या पान टपर्यांवर छापे टाकून प्रशासनाने हजारो रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त केला. या कारवाईमुळे अवैध विक्री करणार्यांचे धाबे दणाणले असून, प्रशासनाला इतया विलंबाने का जाग आली, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, अन्न सुरक्षा अधिकारी किरण जगदाळे यांनी लासिक पान स्टॉलवर छापा टाकला. तेथे नोमान नासिर सय्यद (वय २७) याच्या ताब्यातून २,१५० रुपयांचा विमल पानमसाला, व्ही-१ तंबाखू आणि माणिकचंद असा साठा जप्त करण्यात आला. दुसर्या कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप पवार यांनी सारंग पान स्टॉलवर छापा टाकून अरबाज शकील सय्यद (वय २८) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४,३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे हा साठा गुजरात राज्यातून खाजगी वाहनाने (ट्रॅव्हल्स) आणल्याची कबुली आरोपीने दिली आहे.तिसरी कारवाई आशा चित्रपटगृहाच्या मागे असलेल्या फेमस पान शॉपवर करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी उज्वला पाटील यांच्या तक्रारीवरून दानिश जावेद बागवान (वय २५) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्याकडूनही विमल आणि सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली आहे.प्रतिबंधित पदार्थ मानवी आरोग्यास अत्यंत घातक असून त्यामुळे कर्करोगासारखे गंभीर आजार उद्भवू शकतात. हे माहित असूनही केवळ आर्थिक फायद्यासाठी या विक्रेत्यांनी शासनाच्या बंदी आदेशाचे उल्लंघन केले. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हे नोंदवले आहेत. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
तरुणावर चॉपरने हल्ला
अहिल्यानगर: शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, नालेगाव परिसरातील जनकल्याण रक्तपेढीजवळ एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. फिर्यादी करण दीपक लांडे (वय २१, रा. ठाणगे मळा, नालेगाव) हा रात्रीच्या सुमारास आपल्या घराकडे जात असताना ही घटना घडली.
जुन्या वादातून आणि भावाला केलेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी हा हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी शिवाजी बाबुराव अनभुले, संभाजी बाबुराव अनभुले आणि राहुल बाळासाहेब वाकळे या तिघांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी राहुल वाकळे हा दुचाकी चालवत होता, तर शिवाजी अनभुले याच्या हातात लोखंडी चॉपर होता. आरोपींनी फिर्यादीला गाठून काही समजण्याच्या आतच त्यांच्यावर पाठीवर आणि दंडावर वार केले. महे भावाला मारल्याचा बदला आहे असे ओरडत आरोपींनी लाकडी दांडयानेही बेदम मारहाण केली. हल्ल्यानंतर जखमी तरुणाने आरडाओरडा केल्यामुळे आजूबाजूचे नागरिक जमा झाले, त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटस्फोटास नकार दिल्याने जावयाला बेदम मारहाण
अहिल्यानगर: पत्नीला घटस्फोट देण्यास नकार दिल्याच्या रागातून दोन मेव्हण्यांनी आपल्या जावयाला पुणे बसस्थानक परिसरातून उचलून नेत मुकुंदनगर भागात लोखंडी रॉड आणि लाकडी दांडयाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दोन मेव्हण्यांसह अन्य दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अजीज अहमद खान (रा. वाशी, नवी मुंबई) हे एका खासगी वाहतूक कंपनीत नोकरी करतात. त्यांचे आणि त्यांच्या पत्नीचे गेल्या दीड वर्षापासून कौटुंबिक वाद सुरू असून, अहिल्यानगर न्यायालयात घटस्फोटाचा खटला प्रलंबित आहे. फिर्यादी घटस्फोट देण्यास तयार नसल्याने त्यांच्या सासरच्या मंडळींकडून त्यांना सातत्याने धमकावले जात होते. १८ एप्रिल रोजी न्यायालयातील तारीख संपवून मुंबईला जाण्यासाठी फिर्यादी पुणे बसस्थानकावर थांबले असता, त्यांचे मेव्हणे अजम अजगर अली खान आणि हुसेन अजगर अली खान तेथे आले.दोघांनी फिर्यादीला शिवीगाळ करत जबरदस्तीने दुचाकीवर बसवून मुकुंदनगर येथे नेले. तेथे घटस्फोट दे, नाहीतर हातपाय तोडून टाकू अशी धमकी देत अजम याने लाकडी दांडयाने फिर्यादीला मारहाण केली.
भरदिवसा महिलेला अडवून मारहाण
अहिल्यानगर: शहरातील भिस्तबाग चौक परिसरात एका महिलेला अडवून तिला लाकडी दांडयाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. मुलीला शाळेत सोडण्यासाठी जात असताना आरोपीने हा हल्ला केला. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला आपल्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी घरातून निघाली होती. यावेळी आरोपी अतुल कैलास तरटे याने महिलेला फोनवरून अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपीने मोटारसायकलवरून येत महिलेचा रस्ता अडवला. मी तुझ्या मुलीला घेऊन जाणार असे म्हणत त्याने वाद घालण्यास सुरुवात केली. महिलेने विरोध केला असता, आरोपीने तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. संतापलेल्या आरोपीने जमिनीवर पडलेल्या लाकडी दांडयाने महिलेच्या हातावर, पायावर आणि डोळ्याखाली गंभीर वार केले. मारहाण करतानाच आरोपीने मी पोलिसांना घाबरत नाही, सहा महिने जेलमध्ये राहिलो तरी पुन्हा बाहेर येऊन तुला जिवंत सोडणार नाही, अशी जीवे मारण्याची धमकी दिली.










