संगमनेर / नगर सह्याद्री –
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी संगमनेर येथील आमदार सत्यजीत तांबे यांच्या ‘प्रभा’ निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी पारनेर-नगर मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते, माजी नगराध्यक्ष सौ. दुर्गा तांबे व डॉ. मैथिली तांबे उपस्थित होत्या.
भेटीदरम्यान संगमनेर शहरातील महिला सुरक्षेसाठी नगरपालिके तर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘रक्षक दल’ उपक्रमाची आदिती तटकरे यांनी सविस्तर माहिती घेतली. या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या सुरक्षेसाठी स्थानिक पातळीवर प्रभावी उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केल्याप्रमाणे संगमनेरमधील ‘रक्षक दल’ उपक्रमाचा आदर्श घेत राज्यभर अशा प्रकारचे उपक्रम राबविण्याचा सरकारचा मानस असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी नगराध्यक्ष सौ. दुर्गा तांबे यांनी आदिती ताई तटकरे यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून स्वागत केले. भेटीदरम्यान महिला सक्षमीकरण व सुरक्षिततेसंदर्भात विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.










