सुपा-पारनेर रस्त्यावर भीषण अपघात; पती-पत्नीचा जागीच मृत्यू
कन्हेर ओहोळ परिसरातील दुर्घटनेने हळहळ; काँक्रीट मिक्सर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
पारनेर / नगर सह्याद्री –
सुपा ते पारनेर मार्गावरील कन्हेर ओहोळ परिसरात सोमवारी (दि. 23 जून) सकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी पारनेर पोलिसांनी काँक्रीट मिक्सर चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिमराव गुंडू कांबळे आणि त्यांची पत्नी गौरी भिमराव कांबळे (सध्या रा. सुपा, ता. पारनेर, मूळ रा. उमगाव, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) हे दोघे त्यांच्या स्कुटी (क्र. एमएच-09 जीएन-5303) वरून सुपा येथून पारनेरकडे जात होते. दरम्यान, सकाळी सुमारे 11.50 वाजण्याच्या सुमारास कन्हेर ओहोळ परिसरात त्यांच्या दुचाकीच्या पाठीमागून येणाऱ्या काँक्रीट मिक्सर (क्र. एमएच-16 सीडी-9150) वाहनाने धडक दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या धडकेमुळे कांबळे दाम्पत्याची दुचाकी रस्त्याच्या बाजूला कोसळली. त्यानंतर दोघेही काँक्रीट मिक्सरच्या मागील चाकाखाली आल्याने त्यांच्या डोक्याला, छातीला तसेच हात-पायांना गंभीर दुखापती झाल्या. अपघात इतका भीषण होता की दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी विजय आलेसराव आरसुड (रा. सुपा) यांनी पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, ते स्वतःही पारनेर येथे जमीन खरेदीच्या कामासाठी येत असताना कन्हेर ओहोळ येथे अपघातस्थळी पोहोचले. तेव्हा रस्त्यावर मोठी गर्दी जमलेली होती. घटनास्थळी उभी असलेली स्कुटी पाहून त्यांनी ती भिमराव कांबळे यांची असल्याचे ओळखले. त्यानंतर मृतांमध्ये गौरी कांबळे यांची ओळख पटली. दुसऱ्या मृत व्यक्तीची अवस्था अत्यंत गंभीर असल्याने ओळख पटविणे कठीण होते; मात्र तो भिमराव कांबळे असल्याचे नंतर स्पष्ट झाले.
फिर्यादीनुसार, काँक्रीट मिक्सर चालकाने रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालविले. धडक दिल्यानंतर चालकाने वाहन न थांबवता तसेच जखमींना कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून निघून गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेमुळे सुपा परिसरात शोककळा पसरली असून कांबळे दाम्पत्याच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. पारनेर पोलीस पुढील तपास करीत आहेत.










