उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध; रस्ते
पारनेर/प्रतिनिधी :
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पारनेर शहराच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे शिवसेना नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी पारनेरकरांसाठी आणखी ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. काही दिवसांपूर्वी मंजूर झालेल्या २ कोटी रुपयांच्या निधीनंतर आता नव्याने ४ कोटी रुपयांची भर पडल्याने पारनेर शहरासाठी एकूण ६ कोटी रुपयांचा विकास निधी उपलब्ध झाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हा निधी मंजूर झाल्याची माहिती सुजित झावरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी पारनेरकरांच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभारही मानले.
सुजित झावरे पाटील यांनी सांगितले की, शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पारनेर शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विकासकामांना गती देण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. त्याचा एक भाग म्हणून रखडलेला पारनेर शहराचा डीपीआर (DPR) मंजूर करण्यात यश आले. त्यानंतर शहराच्या विकासासाठी टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून देण्याचा पाठपुरावा सुरू ठेवण्यात आला.
पहिल्या टप्प्यात मंजूर झालेल्या २ कोटी रुपयांच्या निधीतून पारनेर ते सिद्धेश्वर वाडी रस्ता सुधारणा, पारनेर ते बुगेवाडी रस्ता, तसेच पारनेर शहरातील दशक्रिया घाट परिसरात पार्किंग व्यवस्था व काँक्रिटीकरणाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था, नागरिकांच्या सोयी-सुविधा आणि मूलभूत पायाभूत सुविधा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, आता नव्याने मंजूर झालेल्या ४ कोटी रुपयांच्या निधीमुळे पारनेर शहरातील अंतर्गत रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत करण्यात येणार असून विविध विकासकामांना गती मिळणार आहे. शहरातील पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी हा निधी महत्त्वाचा ठरणार असल्याचे सुजित झावरे पाटील यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत भविष्यातील विकास आराखडाही त्यांनी मांडला. पारनेर शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार व्यक्त करताना ते म्हणाले, “पारनेर ही बाराशे ऋषींची पुण्यभूमी असून या ऐतिहासिक आणि धार्मिक नगरीचा विकास करणे हे आमचे कर्तव्य आहे. उपलब्ध झालेल्या ६ कोटी रुपयांच्या निधीनंतर आगामी काळात शहरासाठी अद्ययावत पाणीपुरवठा योजना राबविणे, सर्व प्राचीन देवस्थानांचा पुनर्विकास, सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे तसेच शहरातील सर्व वाडी-वस्त्यांवर दर्जेदार रस्ते आणि पथदिव्यांची सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा संकल्प आहे.”
या निधीमुळे पारनेर शहराच्या विकासाला नवी चालना मिळणार असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असल्याने आगामी काळात पारनेर शहराचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.










