आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात भव्य मोर्चा
राहुरी | नगर सह्याद्री
राहुरी तालुका अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण कृती समितीच्या वतीने अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणामुळे सामाजिक विविध घटकावर अन्याय होण्याची शक्यता असल्याचा दावा करत या निर्णयाला विरोध करण्यासाठी राहुरी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने महिला व पुरुष सहभागी झाले होते.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार राज्य सरकारांना अनुसूचित जाती प्रवर्गात उपवर्गीकरण करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. सदर निर्णयामुळे अनुसूचित जातीमधील एकतेला बाधा पोहोचून सामाजिक दुरावा निर्माण होण्याची भीती असून राज्य सरकारने अनुसूचित जाती प्रवर्गात कोणतेही उपवर्गीकरण करू नये व एकसंध असलेल्या समाजात फूट पाडू नये. न्यायमूत बदर समितीचा अहवाल त्वरित प्रकाशित करावा, केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल करावी किंवा संसदेत कायद्याने संरक्षण द्यावे. पदोन्नतीमधील आरक्षण तत्काळ लागू करावे व अनु. जाती-जमातीतील मागील अनुशेष भरून काढावा, सर्व अनुसूचित जातींची जातनिहाय जनगणना करूनच पुढील धोरण निश्चित करावे, अनुसूचित जाती आरक्षणाला संरक्षण द्यावे, आदी मागणी आंदोलनकर्त्यानी केली.
मागण्यांचे निवेदन श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवार, राहुरीचे नायब तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी सुरेंद्र थोरात, विलास साळवे, विरोधी पक्षनेते अरुण साळवे, पिंटू नाना साळवे, बाळासाहेब जाधव, भाऊसाहेब पगारे, प्रविण लोखंडे, सचिन साळवे, विवेक सगळगिळे, प्रतिक रूपटक्के, अनुप साळवे, दादु साळवे, किरण साळवे, गोविंद दिवे, नवीन साळवे, राजन ब्राह्मणे, सिद्धांत सगळगिळे, सागर साळवे, माजी नगरसेविका मंदाकिणी साळवे, संगिता थोरात, स्नेहल सांगळे, यमुना भालेराव आदींसह हजारों आंबेडकरी समाज बांधव उपस्थित होते.










