पारनेर | नगर सह्याद्री
माहिती अधिकारी कायद्यातील सुधारणांच्या संदर्भात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 5 जुलैपासून उपोषणाचा इशारा दिला आहे. अण्णांचे वय 90 वर्ष असून अशा वयात उपोषणाचा शारीरिक त्रास सहन करणे अत्यंत कठीण आहे. त्यामुळे अण्णा हजारे यांचे आरोग्य जपा, उपोषणाची वेळ येऊ देऊ नये, सकारात्मक संवाद साधून मार्ग काढण्यात यावा अशी भावनिक साद नगर-पारनेर विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या वतीने आमदार काशिनाथ दाते यांनी विधानसभेत घातली आहे.
सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांनी ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांच्या प्रस्तावित उपोषणाचा विषय अत्यंत संवेदनशीलपणे सभागृहात उपस्थित करत शासनाला तातडीने हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले.
सभागृहात बोलताना आमदार दाते म्हणाले की, माझ्या 224 पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात पद्मभूषण अण्णासाहेब हजारे आणि पद्मश्री पोपटराव पवार यांसारखे दोन थोर समाजसेवक आहेत. माहिती अधिकार कायद्यातील सुधारणांच्या संदर्भात अण्णांनी येत्या 5 जुलैपासून उपोषणाचा इशारा दिला आहे. अण्णांचे वय आज 90 वर्षे असून अशा वयात उपोषणाचा शारीरिक त्रास सहन करणे अत्यंत कठीण आहे.
त्यामुळे माझ्या पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या वतीने शासनाला विनंती करतो की, अण्णांवर उपोषण करण्याची वेळ येऊ नये, यासाठी तातडीने सकारात्मक संवाद साधून मार्ग काढावा.आमदार दाते यांनी अण्णासाहेब हजारे यांच्याविषयी व्यक्त केलेली ही आत्मीयता आणि त्यांच्या आरोग्याबाबत व्यक्त केलेली चिंतेने सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. मतदारसंघातील ज्येष्ठ समाजसेवकांचा सन्मान राखत, त्यांच्या आंदोलनामागील विषयावर शासनाने संवेदनशील भूमिका घ्यावी, अशी स्पष्ट अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.माहिती अधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या अण्णा हजारे यांना उपोषणासारखे टोकाचे पाऊल उचलावे लागू नये, यासाठी शासनाने तातडीने पुढाकार घ्यावा, अशी भावना आमदार काशिनाथ दाते यांनी सभागृहात मांडल्याने त्यांच्या या भूमिकेची सर्वत्र चर्चा होत आहे.










