खरवंडीकासार | नगर सह्याद्री
महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र भगवानगडाच्या पालखीचे आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे प्रस्थान झाले.
श्री क्षेत्र भगवानगडाचे संस्थापक ऐश्वर्य संपन्न श्री संत भगवानबाबा यांनी नारायण गडावर असतानाच मराठवाड्यातून पहिला पायी पालखी सोहळा प्रारंभ केला होता. तेव्हापासून आजपर्यंत ही परंपरा अखंडितपने सुरू आहे.द रम्यान प्रस्थानापासून ते पंढरपूरपर्यंत अनेक दिंड्या या पायी पालखी सोहळ्यामध्ये सामील होतात.
या पालखीमध्ये मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भामधून अनेक भाविक सहभागी होतात.या पालखीचा पहिला मुक्काम भारजवाडी, येथे होऊन पुढे बावी, खोकरमोह, करंजवण, दिघोळ, जयवंतनगर, कुंबेफळ, आवार पिंपरी, कुर्डूवाडी, ढेकळेवाडी या ठिकाणी होऊन 11 व्या मुक्कामासाठी पालखी पंढरपूरमध्ये पोहोचते. भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानावेळी आ.मोनिकाताई राजळे, राष्ट्रवादी काँग्रेस पाट प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे,केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ऋषिकेश ढाकणे, जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप, किरण खेडकर, महारुद्र किर्तने, सुनील खेडकर, राजेंद्र जगताप आदीसह परिसरातील हजारो भाविकांची उपस्थिती होती.










