वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा
पाथर्डी | नगर सह्याद्री
तालुक्यातील मिरी, शंकरवाडी, कडगाव व शिराळ परिसराला शुक्रवारी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या मान्सूनपूर्व मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसला. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून विजेचे खांब व तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने जनजीवनही विस्कळीत झाले.

दरम्यान, कडगाव येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत घराचे पत्रे उडून अंगावर पडल्याने एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला. समाबाई विलास शिरसाठ (वय 76) असे मृत महिलेचे नाव आहे.
शुक्रवारी सायंकाळनंतर परिसरात जोरदार वादळी वारे व पाऊस सुरू असताना समाबाई शिरसाठ या आपल्या घरात कुटुंबासह झोपल्या होत्या. त्याचवेळी वादळी वाऱ्याच्या वेगामुळे घरावरील पत्रे उडून त्यांच्या अंगावर कोसळले पत्र्याचा गंभीर आघात डोक्याला झाल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. सुदैवाने घरातील इतर सदस्यांनी प्रसंगावधान राखत वेळीच घराबाहेर धाव घेतल्याने त्यांचा जीव वाचला.
घटनेची माहिती मिळताच मिरी येथील माऊली जन आरोग्य फाउंडेशनचे संचालक ज्ञानेश्वर दाणे यांनी रुग्णवाहिकेची व्यवस्था करून मृतदेह पाथड उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला.वादळी वाऱ्यामुळे मिरी परिसरातील अनेक ठिकाणी विजेच्या तारा व खांबांचे नुकसान झाले. परिणामी अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. रात्रभर वीज उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.दुसरीकडे, शिराळ परिसरातही वादळी वाऱ्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. शेतातील सोलर पॅनलच्या प्लेटा उडून गेल्याने सौर कृषी पंपांचे नुकसान झाले आहे. शिराळ येथील शेतकरी अक्षय निवृत्ती झाडे यांच्या गट क्रमांक 459 मधील ओसवाल कंपनीच्या सौर कृषी पंपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
अचानक आलेल्या या वादळामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, नुकसानग्रस्तांना तातडीने मदत व पंचनामे करण्याची मागणी होत आहे.










