- जाहिरात -spot_img
breaking news

वारकऱ्यांच्या सेवेत खासदार नीलेश लंके, परिते येथील अन्नछत्राचा शुभारंभ

वारकऱ्यांसाठी उभा राहिला माणुसकीचा महाप्रसाद

पारनेर | नगर सह्याद्री
आषाढी वारीच्या निमित्ताने विठ्ठलभक्तांच्या सेवेसाठी खासदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या सोलापूर जिल्ह्यातील परीते येथील अन्नछत्राचा रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ झाला. नीलेश लंके प्रतिष्ठान आणि ‌‘आपला मावळा‌’ सामाजिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाची सुरुवात खासदार लंके यांच्या हस्ते पांडुरंगाच्या प्रतिकृतीस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर पंढरीच्या दिशेने निघालेल्या हजारो वारकऱ्यांसाठी अन्नदानाला प्रारंभ झाला आणि ‌’विठ्ठल नामाचा गजर‌’ तसेच सेवाभावाच्या वातावरणात संपूर्ण परिसर भारावून गेला.

गेल्या पाच वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या या सेवायज्ञाने यंदाही वारकऱ्यांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले. वारीच्या प्रवासात दमलेल्या भाविकांसाठी सकाळी गरमागरम वडा-पाव, बाटलीबंद पाण्याचे पाणी आणि वाफाळता चहा देण्याची व्यवस्था करण्यात आली. अनेक वारकऱ्यांनी दिंडीच्या प्रवासात प्रथमच गरमागरम वडा-पाव खायला मिळाल्याचे सांगत समाधान व्यक्त केले. सेवाभावाने दिलेले हे अन्न केवळ पोटाची भूक भागवणारे नसून माणुसकीची ऊब देणारे असल्याच्या भावना अनेक वारकऱ्यांनी व्यक्त केल्या.

अन्नछत्राच्या उद्घाटनानंतर खासदार लंके यांचे सहकारी आणि शेकडो स्वयंसेवक वारकऱ्यांच्या सेवेत तत्परतेने कार्यरत झाले. अन्नवाटप, चहा वितरण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वारकऱ्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणे अशी विविध कामे स्वयंसेवकांकडून केली जात होती.विशेष म्हणजे, खासदार लंके यांनीही केवळ पाहुण्याची भूमिका न बजावता प्रत्यक्ष सेवेत स्वतःला झोकून दिले. पाण्याचे बॉक्स उतरविणे, साहित्याची ने-आण करणे, परिसरातील कचरा गोळा करणे, स्वयंसेवकांना मदत करणे अशा विविध कामांमध्ये ते स्वतः सहभागी झाले. त्यामुळे उपस्थित वारकऱ्यांनी त्यांच्या या साधेपणाचे आणि सेवाभावी वृत्तीचे कौतुक केले.

वारकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेणारे खासदार लंके अनेक भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले. गरमागरम वडा-पाव आणि चहाचा आस्वाद घेतल्यानंतर अनेक वारकऱ्यांनी त्यांच्यासोबत छायाचित्रे आणि सेल्फी घेण्याची इच्छा व्यक्त केली. लंके यांनीही प्रत्येक वारकऱ्याशी आत्मीयतेने संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या. त्यामुळे अन्नछत्र परिसरात भक्ती, सेवा आणि आपुलकीचा सुंदर संगम पाहायला मिळाला. 19 ते 22 जुलै या चार दिवसांच्या कालावधीत हा सेवाभावी उपक्रम सुरू राहणार असून, या काळात लाखो वारकऱ्यांना अन्नदान, चहा, पिण्याचे पाणी तसेच आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. संपूर्ण उपक्रमादरम्यान खासदार नीलेश लंके स्वतः परीते येथे उपस्थित राहून वारकऱ्यांच्या सेवेत सहभागी होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

हे सुद्धा वाचा :  यंदा राज्यात किती पाऊस पडणार? IMD च्या अंदाजाने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली

उपक्रमासाठी उभारण्यात आलेल्या मंचावर दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच खासदार नीलेश लंके यांचे जिवाभावाचे सहकारी, पंचायत समितीचे माजी सदस्य राजेंद्र चौधरी आणि रूईछत्रपतीचे माजी सरपंच बंडूजी साबळे यांच्या प्रतिमा ठेवून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करत सेवाभावाची ही परंपरा पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. चार दिवस चालणाऱ्या या सेवायज्ञात लाखो वारकऱ्यांना दिलासा मिळणार असून, विठ्ठलभक्तांच्या सेवेतून समाजकारणाचा एक प्रेरणादायी आदर्श पुन्हा एकदा उभा राहत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ