700 कोटींचे भूसंपादन करूनही मार्ग बदलला
संगमनेर | नगर सह्याद्री
माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्व तांत्रिक बाबी, पर्यावरणीय मुद्दे, सुपीक जमीन आणि शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन नाशिक – पुणे रेल्वेमार्ग निश्चित करण्यात आला होता. मात्र, महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर नाशिक- पुणे रेल्वे मार्ग बदलण्यात आला. संगमनेर आणि अकोले तालुक्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेली ही रेल्वे शिर्डीकडे पळविण्यात आली आहे, असा गंभीर आरोप संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ.जयश्री थोरात यांनी केला.
नाशिक – पुणे रेल्वेप्रश्नी माध्यमांशी संवाद साधताना डॉ.थोरात म्हणाल्या की, महाविकास आघाडीच्याकाळात माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून पुणे – चाकण -नारायणगाव – आळेफाटा- संगमनेर – सिन्नर – नाशिक असा रेल्वेमार्ग निश्चित करण्यात आला होता. या मार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला होता. तसेच भूसंपादन प्रक्रियाही मोठ्या प्रमाणात पूर्ण झाली होती.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी 700 कोटी रुपयांहून अधिक रक्कम देण्यात आली होती. त्यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक बैठका घेऊन सुपीक जमीन, वनक्षेत्र आणि शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन हा मार्ग निश्चित करण्यात आला होता. मात्र, महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर 2024 नंतर हा मार्ग बदलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.एकीकडे पालकमंत्री वेगवेगळे दावे करत आहेत. कधी रेल्वे शिडमार्गे जाणार असल्याचे सांगितले जाते, तर कधी देवठाणमार्गे मार्ग प्रस्तावित असल्याचे सांगितले जाते. मात्र, मूळ मंजूर मार्ग रद्द करून संगमनेरच्या वाट्याला आलेली रेल्वे शेजारच्या तालुक्याकडे वळविण्यात आली आहे, असेही त्या म्हणाल्या.
संगमनेर हा सहकार, शिक्षण आणि व्यापाराच्या क्षेत्रात राज्यातील एक आदर्श तालुका असल्याचे सांगत डॉ.थोरात म्हणाल्या, संगमनेर तालुक्यातील 25 हजारांहून अधिक विद्याथ शिक्षण आणि रोजगारासाठी पुण्यात आहेत. रेल्वेची सुविधा उपलब्ध झाली असती तर पुणे-संगमनेर हे अंतर अवघ्या दोन तासांत पार करता आले असते. सध्या नागरिकांना पाच ते सहा तासांचा बसप्रवास करावा लागतो. अनेक युवक जीव धोक्यात घालून दुचाकीने प्रवास करतात. त्यातून अनेक अपघात घडले आहेत. हा प्रश्न अत्यंत गंभीर असून, आता जनतेने रस्त्यावर उतरून लढा देण्याची वेळ आली आहे. केवळ नेते बोलून हा प्रश्न सुटणार नाही. सर्वसामान्य नागरिकांनीही एकत्र येऊन आपल्या हक्कासाठी संघर्ष केला पाहिजे.युवक काँग्रेसच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात येणार असून, हक्काची रेल्वे मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. संगमनेर हा चळवळींमधून घडलेला तालुका आहे. संघर्ष करणे आमच्या रक्तात आहे. हक्काची रेल्वे मिळविण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा डॉ. जयश्री थोरात यांनी दिला आहे.










