अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील चिंचपुर पांगुळ येथे झालेल्या धाडसी दरोड्याचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 48 तासांत करत “बदाम गँग”ला जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 10 गुन्ह्यांचा उलगडा करत सुमारे 10 लाख 71 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
18 मार्च 2026 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चिंचपुर पांगुळ येथील दगडू भिमराज बडे यांच्या घरात सहा अज्ञात आरोपींनी जबरदस्तीने प्रवेश करून चाकूच्या धाकावर दरोडा टाकला होता. आरोपींनी फिर्यादीच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने तसेच घरातील रोख रक्कम असा एकूण 1 लाख 62 हजार रुपयांचा ऐवज लुटला होता. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करण्यात आले. पथकाने तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे चिंचोली परिसरात सापळा रचून बदाम काळे व त्याच्या पाच साथीदारांना अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बदाम कडू काळे, साईनाथ चव्हाण, ऋतिक चव्हाण, महेश उर्फ उमेश काळे, भैय्या काळे आणि लाकर काळे यांचा समावेश आहे. तर तिघे आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. तसेच आरोपींना आश्रय दिल्याप्रकरणी संजय आव्हाड यालाही अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी आरोपींकडून 69 ग्रॅम सोन्याचे दागिने, सहा मोबाईल फोन आणि दरोड्यासाठी वापरण्यात आलेली शस्त्रे असा एकूण 10 लाख 71 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तपासादरम्यान या टोळीने अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव, नेवासा, राहुरी, सोनई तसेच इतर भागात एकूण 10 दरोडे, जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. प्रमुख आरोपी बदाम काळे व महेश काळे हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली असून पुढील तपास पाथर्डी पोलीस ठाणे करत आहे.










