पतीसह पाच जणांवर गुन्हा, वंजारवाडी येथील घटना; माय-लेकाच्या मृत्यूने तालुक्यात शोककळा
जामखेड | नगर सह्याद्री
जामखेड तालुक्यातील वंजारवाडी येथे घडलेल्या माय-लेकाच्या मृत्यूच्या घटनेने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. सासरी होत असलेल्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून एका विवाहितेने आपल्या दीड वर्षीय मुलासह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब तपासातून समोर आली आहे. याप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध खर्डा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेमुळे परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.
वंजारवाडी (ता. जामखेड) येथील साळू शिवाजी चौरे (वय २४) व तिचा दीड वर्षीय मुलगा शिवांश शिवाजी चौरे अशी मृतांची नावे आहेत. तरडगाव येथील दत्तुबा ढाळे यांच्या विहिरीत रविवारी सकाळी दोघांचे मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सुरुवातीला माय-लेक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली होती.
१० मेपासून साळू व तिचा मुलगा घरातून निघून गेल्यानंतर नातेवाईकांकडून त्यांचा शोध सुरू होता. मात्र, रविवारी सकाळी विहिरीत दोघांचे मृतदेह तरंगताना दिसून आले आणि एकच शोककळा पसरली. दोघांना तत्काळ जामखेड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले, मात्र डॉटरांनी त्यांना मृत घोषित केले.याप्रकरणी मृत साळूचे वडील देवीदास शंकर तांदळे (रा. बांगर वस्ती, वंजारवाडी) यांनी खर्डा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. शेतीची कामे, जनावरांची देखभाल तसेच घरातील कामे व्यवस्थित होत नसल्याच्या कारणावरून तिला वारंवार शिवीगाळ, मारहाण व अपमानास्पद वागणूक दिली जात होती. किरकोळ कारणांवरूनही तिला त्रास दिला जात असल्याने ती मानसिक तणावाखाली होती, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या सततच्या छळाला कंटाळून साळूने आपल्या चिमुकल्या मुलासह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानुसार पती शिवाजी अंगद चौरे, सासरे अंगद दशरथ चौरे, सासू विजूबाई अंगद चौरे, दीर धनंजय अंगद चौरे आणि जाऊ कमल धनंजय चौरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रवीण लोखंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. खर्डा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक उज्ज्वलसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, स. फौ. सय्यद पुढील तपास करीत आहेत.
पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार
दरम्यान, माय-लेकाच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी खर्डा पोलिस ठाण्यासमोर मोठी गर्दी केली होती. काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलीस प्रशासनाने अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला होता. गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि पोलिसांच्या मध्यस्थीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात माय-लेकावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे जामखेड तालुयात हळहळ व्यक्त होत असून, ग्रामीण भागातील विवाहित महिलांवरील कौटुंबिक छळाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.










