- जाहिरात -spot_img
breaking news

महिला वकिलावर जीवघेणा हल्ला; बनावट पोर्टल तयार करून फसवणूक; महिलेच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या, कुठे काय घडलं पहा

​अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोड परिसरात एका महिला वकिलाला अडवून दोन अनोळखी इसमांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात संबंधित महिलेचा गळा आवळून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, आरोपींनी कात्रीने त्यांचे केस कापून परिसरात दहशत निर्माण केली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला वकील आपल्या मुलाला आणण्यासाठी दुचाकीवरून जात असताना ऑक्झिलीयम शाळेजवळ ही घटना घडली. दोन अज्ञात इसमांनी दुचाकी आडवी लावून त्यांना थांबवले व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. “शेजाऱ्यांविरोधातील न्यायालयीन खटला मागे घे, अन्यथा तुला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देत आरोपींनी त्यांच्या गळ्यातील ओढणीने गळा आवळला. इतक्यावरच न थांबता, एका आरोपीने खिशातील कात्रीने महिलेचे केस कापले व “पुढच्या वेळी तुझा गळा कापू” असा सज्जड दम देऊन तेथून पळ काढला.

​या प्रकरणी पोलिसांनी विवेक घोडके, सोनिया घोडके आणि दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. घटनेचा पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना चव्हाण करत आहेत. भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

बनावट पोर्टल तयार करून शासन, कंपनीची फसवणूक; काय घडलं पहा
पुण्याच्या सॉफ्टमेट सिस्टीम्सकडून ‘महा-डीएनयुएलएम’च्या बनावट संकेतस्थळाद्वारे फसवणूक; अहिल्यानगर सायबर पोलिसांत गुन्हा दाखल
​अहिल्यानगर : शासकीय कामासाठी वापरल्या जाणाऱ्या संकेतस्थळाच्या नावाशी साधर्म्य असणारे बनावट पोर्टल तयार करून शासनाची आणि मूळ कंपनीची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्यात पुणे येथील सॉफ्टमेट सिस्टीम्स एलएलपी कंपनीच्या मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​पुण्यातील नितीन गोपालदास भराडीया यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. भराडीया यांच्या ‘पीआरएम सॉफ्ट सोल्युशन’ कंपनीचे ‘mahadaynulm.com’ हे अधिकृत नोंदणीकृत डोमेन आहे. मात्र, आरोपी कंपनीने केवळ एका अक्षराचा बदल करून ‘mahadynulm.com’ या नावाचे बनावट संकेतस्थळ तयार केले. या बनावट पोर्टलवर मूळ कंपनीचे संपर्क क्रमांक आणि ई-मेल आयडी वापरून ते अधिकृत असल्याचे भासविण्यात आले. स्वतःच्या फायद्यासाठी शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा :  जनगणनेसाठी प्रगणक, पर्यवेक्षक मैदानात

​मे २०२५ मध्ये हा प्रकार घडला असून, तांत्रिक बाबींची शहानिशा केल्यानंतर गुरुवारी सायबर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक सागर ढिकले या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. बनावट संकेतस्थळांच्या माध्यमातून होणाऱ्या अशा फसवणुकीमुळे खळबळ उडाली आहे.

महिलेच्या त्रासाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
​अहिल्यानगर: सावेडी भागातील एका ४५ वर्षीय व्यक्तीने महिलेच्या सततच्या त्रासाला आणि धमक्यांना कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, रेखा मनोज उदावंत या महिलेने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संबंधित व्यक्तीकडे वारंवार पैशांची मागणी केली होती. पैसे न दिल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची आणि समाजात बदनामी करण्याची धमकी तिने वेळोवेळी दिली. या मानसिक छळाला कंटाळून गंगाधर पाराजी वारुळे यांनी ७ मार्च रोजी पहाटे बुऱ्हाणनगर परिसरातील एका शेतजमिनीतील विहिरीत उडी घेऊन आपले जीवन संपवले.

​या प्रकरणी मृत व्यक्तीच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून रेखा उदावंत विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष कुमार वमने आणि पोलीस निरीक्षक जगदीश भांवळ यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम श्रीवास्तव करत आहेत. बदनामीच्या भीतीपोटी एका व्यक्तीला टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडल्यामुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.

मजुरावर धारदार शस्त्राने हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
​अहिल्यानगर : शहरात गुन्हेगारीच्या घटनांचे सत्र सुरूच असून सावेडी नाका परिसरात मजुरी करणाऱ्या एका तरुणावर चौघांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भंगाराचे काम करून घरी परतणाऱ्या तरुणाला अडवून जुन्या वादातून किंवा किरकोळ कारणावरून धारदार वस्तूने वार करून जखमी करण्यात आले आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अनोळखी हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा :  शाळा, मंदिर, दर्गा परिसरात खुलेआम दारू अड्डे ...कोणत्या गावातील प्रकार

​मिळालेल्या माहितीनुसार, सोनु सुरर्जासंग भोंड (वय २५, रा. काटवन खंडोबा) हे मजूर आपले काम संपवून मित्रासोबत घरी जात होते. दरम्यान, डी मार्ट चौकाकडून अहिल्यानगरकडे जात असताना दोन मोटारसायकलवरून चार अनोळखी इसम त्यांच्या पाठोपाठ आले. ‘तुला खूप माज आला आहे, तुला आम्ही बघतोच,’ अशी धमकी देत आरोपींनी त्यांना रस्त्यात अडवले आणि गाडीवरून खाली ओढले. यातील एकाने सोनु यांच्या छातीवर जोरात वार केला, तर दुसऱ्याने हातातील धारदार शस्त्राने त्यांच्या पोटावर आणि पाठीवर सपासप वार करून त्यांना गंभीर जखमी केले.

​भररस्त्यात झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. जखमी सोनु यांना तातडीने उपचारासाठी पॅसिफिक सुपरस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी रुग्णालयात जाऊन फिर्यादीचा जबाब नोंदवला असून, भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), १२६(२) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप अकोलकर करत आहेत.

घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; बोल्हेगाव परिसरातील घटना
​अहिल्यानगर – शहरातील बोल्हेगाव परिसरातील कळमकर नगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरात पाठीमागच्या भिंतीवरून बेकायदेशीरपणे प्रवेश करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही १० मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास आपल्या घरी एकटीच होती. यावेळी आरोपी प्रेमराज साळवे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. सिद्धार्थनगर) याने घराच्या पाठीमागच्या भिंतीवरून आत प्रवेश केला. आरोपीने पीडितेचा हात धरून तिला ओढले आणि “माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू माझ्याशी लग्न कर,” असे म्हणून अश्लील वर्तन केले. पीडितेने प्रसंगावधान राखून आरडाओरडा केला असता, शेजारील नागरिक मदतीसाठी धावून आले. लोकांची चाहूल लागताच आरोपीने तेथून पळ काढला.

हे सुद्धा वाचा :  संभाजी महाराजांचे शौर्य, राष्ट्रप्रेम प्रेरणादायी ः महापौर गाडे

​या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७५, ३३३ आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) कलम ८ व १२ नुसार गुन्हा नोंदवला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी करत आहेत. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली असून, भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

 

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ