तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
धार्मिक सहलीचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकांची आणि महिलांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगर येथे उघडकीस आला आहे. वैष्णोदेवी आणि अमरनाथ यात्रेला नेण्याच्या बहाण्याने एका ट्रॅव्हल्स चालकाने भाविकांना तब्बल दोन लाख ५६ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव गुप्ता येथील दिनेश पोपट भोर याने त्याच्या बाबा अमरनाथ टूर अँड ट्रॅव्हल्स या व्यवसायाची माहिती देऊन लोकांचा विश्वास संपादन केला. त्याने सावेडी परिसरातील स्मिता अनिल शितोळे आणि त्यांच्या पतीला हेलिकॉप्टर व इतर चांगल्या सुविधा देण्याचे आमिष दाखवले. वैष्णोदेवी, अमरनाथ यात्रेचे बुकिंग सुरू असल्याचे सांगून त्याने फिर्यादी शितोळे यांच्यासह त्यांच्या परिचयातील इतर लोकांकडून पैसे गोळा केले. या सर्वांनी विश्वासाने वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने दिनेश भोर याला एकूण २ लाख ५६ हजार रुपये पाठवले.
पैसे घेतल्यानंतर काही दिवसांनी आरोपी दिनेश भोर याने तेथील हवामान खराब असल्याचे आणि हेलिकॉप्टर सेवा बंद असल्याचे कारण सांगून सहलीला नेण्यास टाळाटाळ सुरू केली. फिर्यादी व त्यांच्या सोबत्यांनी आपले पैसे परत मागितले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि पैसे परत केले नाहीत. या दरम्यान संशयित आरोपीकडे टूर अँड ट्रॅव्हल्सचे कोणतेही अधिकृत परवाना (लायसन्स) नसून त्याने लोकांची शुद्ध फसवणूक केल्याचे समोर आले. या फसवणुकीबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर पोलीस अंमलदार साठे आणि महिला पोलीस अंमलदार नेटके या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
नोकरीच्या बहाण्याने तरुणाची १२ लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक; तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल
अहिल्यानगर: नोकरीचे आमिष दाखवून एका तरुणाची तब्बल १२ लाख ३५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगरमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी बोल्हेगाव येथील विठ्ठल रेवन्नाथ पाटेकर या ३२ वर्षीय तरुणाने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी मंगेश मार्शल भिंगारदिवे, नितीन बाळासाहेब जाधव, कालिदास बेळगे, दिवाकर नादी आणि बाळासाहेब केदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी विठ्ठल पाटेकर यांची ओळख टायपिंग क्लासला जात असताना मंगेश भिंगारदिवे याच्याशी झाली होती. मंगेशने आरोग्य विभागात लॅब टेक्निशियनची नोकरी लावून देतो असे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून वेगवेगळ्या टप्प्यांवर पाटेकर यांच्याकडून एकूण १५ लाख रुपये उकळले. नोकरीचे काम न झाल्याने पाटेकर यांनी पैशांची मागणी केली असता, आरोपींनी त्यांना स्टेट बँक ऑफ इंडिया आणि नंतर एका निवासी शाळेचे खोटे नियुक्ती आदेश (ऑर्डर) देऊन त्यांची फसवणूक केली.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पाटेकर यांनी पैशांसाठी तगादा लावला. त्यावर आरोपींनी त्यांना वारंवार धमकावले आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. तडजोडी दरम्यान पाटेकर यांना २ लाख ६५ हजार रुपये परत मिळाले, मात्र उर्वरित १२ लाख ३५ हजार रुपये आरोपींनी हडप केले. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कल्पना चव्हाण पुढील तपास करत आहेत.
बुरुडगाव रस्त्यावरील वकिलाचे कार्यालय फोडले; ३८ हजार रुपयांची रोकड लंपास, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
अहिल्यानगर: शहरातील बुरुडगाव रस्ता परिसरातील यश अपार्टमेंटमध्ये असलेल्या एका वकिलाच्या कार्यालयाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने ३८ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सावेडी येथील तपोवन रोड परिसरात राहणारे वकील सुधीर विष्णुपंत टोकेकर (वय ६०) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टोकेकर यांचे वैभव हॉटेलसमोरील यश अपार्टमेंटमध्ये पक्षकारांसाठी कार्यालय आहे. ९ जूनच्या सायंकाळी ७ ते १० जूनच्या दुपारी १२ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने या बंद कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने कार्यालयातील कामगार संघटनेच्या कपाटाचे लॉकर उचकटून त्यात ठेवलेले ३६ हजार ५०० रुपये किमतीच्या ५०० रुपयांच्या नोटा आणि १ हजार ५०० रुपयांची चिल्लर नाणी असा एकूण ३८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संभाजी गायकवाड आणि महिला पोलीस उपनिरीक्षक अमिना शेख यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस नाईक योगिता साळवे करत आहेत. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले जात आहे.
विवाहितेचा छळ; सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल
अहिल्यानगर – येथील केडगाव परिसरात एका २१ वर्षीय विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून शारीरिक व मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात पती, सासू, सासरे आणि नणंदेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला गरोदर असताना सासरच्यांनी तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला बेदम मारहाण केली. जुलै २०२४ मध्ये अंघोळ करत असताना सासरे वसंत यांनी बाथरूमच्या छिद्रातून डोकावून पाहत महिलेचा विनयभंग केला. याबाबत पतीने साताऱ्याची बाजू घेत विवाहितेलाच गप्प केले व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. त्यानंतर नोव्हेंबर २०२४ मध्ये सासू आणि नणंद चैताली यांनी पतीचे कान भरल्याने पतीने विवाहितेला मारहाण केली. सासू-नणंदेने देखील गरोदरपणात तिचे केस ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
महिलेला मुलगी झाल्यानंतरही सासरच्यांनी तिला नांदवण्यास नकार दिला व मुलीची जबाबदारी नाकारली. या प्रकरणी भरोसा सेलमध्ये समझोता न झाल्याने अखेर पीडितेने कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या गंभीर गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास पोलीस हवालदार संतोष लगड करत आहेत.
जुगाराचे आमिष दाखवून चालकाला ५५ हजारांना लुटले; चार अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल
अहिल्यानगर:
शहरातील नेप्ती टोलनाका परिसरामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जुगारात पैसे जिंकल्याचे खोटे सांगून एका चालकाला तब्बल ५५ हजार रुपयांना लुटण्यात आले आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजकुमार मस्तराम यादव (वय २८ वर्षे, व्यवसाय- चालक, मूळ रा. सुल्तानपूर, उत्तर प्रदेश) हे निंबळक एमआयडीसीकडून केडगाव बायपासच्या दिशेने जात होते. यावेळी नेप्ती टोलनाक्याजवळ चार अज्ञात इसमांनी त्यांना गाठले. ‘तू जुगारात पैसे जिंकला आहेस’ असे खोटे सांगून आरोपींनी राजकुमार यांना जाळ्यात ओढले. त्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडून ६ हजार रुपये रोख, मोबाईलमधील फोन पे या ॲपद्वारे ९ हजार रुपये आणि एटीएममधून ४० हजार रुपये काढून घेतले. अशा प्रकारे एकूण ५५ हजार रुपयांची फसवणूक करून आरोपींनी तिथून पळ काढला.
या घटनेनंतर राजकुमार यादव यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी तातडीने भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गांगर्डे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी अज्ञात ठगांचा शोध सुरू केला आहे.
कामरगाव येथील दर्ग्याची तोडफोड; अज्ञात समाजकंटकांविरुद्ध गुन्हा दाखल, अहिल्यानगर पोलीस प्रशासनाकडून घटनास्थळाची पाहणी
अहिल्यानगर : येथील नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामरगाव शिवारात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील डोंगरावर असलेल्या प्रसिद्ध शहारबशा बाबा दर्ग्याच्या आवारात शिरून अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई सुरू केली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, कामरगाव येथील डोंगरावरील शहारबशा बाबा दर्ग्याचे पुजारी आणि खादीम महम्मद सलीन गफुर शेख (वय ५५ वर्षे, रा. कामरगाव) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. दिनांक ९ जून २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपासून ते दिनांक १० जून २०२६ रोजी सायंकाळी ४:०० वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. कोणीतरी अज्ञात समाजकंटकांनी दर्ग्याच्या आवारात बेकायदेशीर प्रवेश केला. त्यांनी दर्ग्याचे ५ मिनार, कळस, कमान तसेच गाभाऱ्यातील शहारबशा बाबांच्या मजार आणि समाधीची मोठी तोडफोड केली. हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मीयांच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या आणि समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने ही विटंबना करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेची माहिती मिळताच अहिल्यानगर पोलीस दलातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. यामध्ये पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासोबत नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे आणि पोलीस उपनिरीक्षक पतंगे यांनीही भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम १९६ आणि २९८ प्रमाणे अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पतंगे करत आहेत.










