- जाहिरात -spot_img
breaking news

मिरीत पुन्हा पाण्याची तीव्र टंचाई , चार कोटींची योजना अद्याप अपूर्णच

जलजीवन मिशनच्या रखडलेल्या कामावर ग्रामस्थांचा संताप | 

पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

पाथर्डी | नगर सह्याद्री
 तालुक्यातील मिरी गावाला पुन्हा एकदा पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत असून ग्रामस्थांचे हाल सुरू झाले आहेत. जलजीवन मिशन अंतर्गत गावासाठी सुमारे चार कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन देखील व कामाची मुदत संपून देखील या योजनेचे काम अद्याप पूर्णत्वास न गेल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी माग लावण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

मिरी गावाला पूव पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये म्हणून मिरी-तिसगाव नळपाणी योजनेचे कनेक्शन घेण्यात आले होते. मात्र, आडगाव येथील उद्भवातून मिळणारे पाणी पुरेसे ठरत असल्याने आणि मिरी-तिसगाव योजनेचे बिल नियमित भरावे लागत असल्यामुळे ग्रामपंचायतीने या योजनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.यानंतर जलजीवन मिशन अंतर्गत गावासाठी नवीन स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेस मंजुरी मिळाली आणि शासनाकडून सुमारे चार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र, कामाचा कालावधी संपूनही योजना अद्याप पूर्ण झालेली नसल्याने नागरिकांना अपेक्षित दिलासा मिळालेला नाही.

याच पार्श्वभूमीवर आमदार प्राजक्त तनपुरे यांनी मिरी येथे रास्ता रोको आंदोलन करून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली होती. त्यावेळी कामातील दिरंगाई आणि कथित गैरव्यवहाराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. राज्यभरातील जलजीवन मिशनच्या विविध योजनांमधील कथित आर्थिक गैरव्यवहाराचा मुद्दा संसद व विधिमंडळात गाजल्यानंतर शासनाने काही अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली असून, मिरी योजनेवर नियंत्रण असणाऱ्या एका अधिकाऱ्याचाही त्यामध्ये समावेश असल्याची चर्चा आहे.
आंदोलनानंतर योजना सुरळीत होईल, अशी ग्रामस्थांना अपेक्षा होती. मात्र, ठेकेदारांकडून तात्पुरती डागडुजी करून काही काळ पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. तसेच मिरी-तिसगाव योजनेतूनही पाणीपुरवठ्याचा प्रयत्न झाला. परंतु काही दिवसांनंतर पुन्हा गावात पाणीटंचाई निर्माण झाल्याने संपूर्ण योजनेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हे सुद्धा वाचा :  महाराष्ट्रात दोन ठिकाणी विधानसभेच्या पोटनिवडणुका होण्याची शक्यता

गावात पिण्याच्या पाण्याबरोबरच अनेक मूलभूत समस्या कायम आहेत. पूर्णवेळ ग्रामसेवक उपलब्ध नाही, जिल्हा परिषद शाळा व हायस्कूलला पूर्णवेळ मुख्याध्यापक नाहीत, तर शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना येथे पूर्णवेळ पशूवैद्यकीय अधिकारी नसल्याची परिस्थिती आहे. या प्रश्नांबाबतही प्रशासन उदासीन असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे.दरम्यान, गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने व कायमस्वरूपी माग लावावा, अन्यथा जबाबदार अधिकारी व संबंधित ठेकेदारांविरोधात ग्रामस्थांना सोबत घेऊन पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा माजी सरपंच संतोष शिंदे यांनी दिला आहे.

स्वतंत्र सुमारे चार कोटी रुपयांच्या योजनेतील कामांची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर निश्चित करून उर्वरित काम तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. दोषी आढळल्यास नियमानुसार कारवाई करून ग्रामस्थांना नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा.
– संतोष शिंदे, भाजप मंडळाध्यक्ष तथा माजी सरपंच.

लवकरच ग्रामस्थांना पाणीपुरवठा
मिरी पाणी योजनेच्या टाकीचे काम पूर्ण झाले आहे. गावठाण भागातील पाणी वितरणासाठी पाईप टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात असून ते पूर्ण झाल्यानंतर लवकरच मिरी ग्रामस्थांना नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल.
– ए. एस. हुगे, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ