बंदला शेवगावकरांचा पाठिंबा
शेवगाव | नगर सह्याद्री
ऑनलाईन औषधे मागविण्याचे दुष्परिणाम लक्षात घेऊन ही पद्धत तत्काळ बंद करण्यात यावी, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने आज बुधवारी संपूर्ण देशातील औषध विक्रेते एक दिवसीय बंद पाळत आहेत. याला शेवगाव तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यासंदर्भात शनिवारी शेवगाव येथील महात्मा सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात शेवगाव केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करून संघटनेचे सर्व पदाधिकारी व तालुक्यातील केमिस्ट बांधवांच्या उपस्थितीत बंदला पाठिंबा दर्शवत ठराव एकमताने पारित करण्यात आला. यावेळी तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सूरज पाटील लांडे, बाळासाहेब देशपांडे, गहिनीनाथ बडे, उपाध्यक्ष गणेश राऊत, सचिव गणेश गवळी आदी उपस्थित होते.
यावेळी संघटनेचे ज्येष्ठ सदस्य गहिनीनाथ बडे यांच्या हस्ते मेडिकल स्टोअरमध्ये बंधनकारक औषध विक्रीची नोंद ठेवण्यासाठी व शासकीय दृष्टीने महत्त्व असलेल्या शेड्युल एच वन रजिस्टरचे प्रकाशन करून तालुक्यातील सर्व मेडिकल दुकानदारांना ते वितरित करण्यात आले. तसेच केमिस्ट परिवारातील विशेष उपलब्धी प्राप्त करणाऱ्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसीय बंद
इंटरनेटवर सुरू असणाऱ्या ऑनलाइन औषध विक्रीच्या व्यवसायामुळे आणि बाजारातील बोगस (बनावट) औषधांमुळे पारंपरिक मेडिकल स्टोअर्सच्या अस्तित्वाला आणि व्यवसायाला मोठा धोका निर्माण झाला आहे. या ऑनलाईन व्यवसायावर आणि बोगस औषध विक्रीवर सरकारने कडक कायदेशीर कारवाई करावी, याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा राष्ट्रीय स्तरावरील एक दिवसीय बंद पुकारण्यात आला आहे. हा संप केवळ एक दिवसाचा बंद नसून केमिस्ट बांधवांच्या भविष्याशी, अस्मितेशी आणि अस्तित्वाशी निगडित असलेला लढा आहे.
– गणेश राऊत, उपाध्यक्ष, शेवगाव मेडिकल असोसिएशन










