- जाहिरात -spot_img
breaking news

पारनेर-जामगाव रस्ताकामात हातपंप बुजवला

ठेकेदाराच्या मनमानी कारभाराचा फटका,
वस्त्यांवरील नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ 

पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर-जामगाव रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू असताना ठेकेदाराने माती आणि खडी टाकून हातपंप बुजवला आहे. मात्र, विकासकामांच्या नावाखाली स्थानिक नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पारनेर-जामगाव रस्त्यालगत असलेल्या ऐतिहासिक व प्रसिद्ध खंडेश्वर मंदिर परिसरातील ओढ्यातील हातपंप संबंधित ठेकेदाराने खडी आणि माती टाकून पूर्णपणे बुजवून टाकला आहे. ठेकेदाराच्या या बेजबाबदार आणि मनमानी कारभारामुळे परिसरातील शेतकऱ्यांना आणि नागरिकांना पाण्यासाठी तीव्र त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
खंडेश्वर मंदिर परिसरातील ओढ्यात असलेला हा हातपंप स्थानिक नागरिकांसाठी जीवनवाहिनी ठरला होता. या हातपंपाच्या पाण्याचा वापर प्रामुख्याने मते वस्ती, कुलट वस्ती, गाडगे वस्ती आणि चौधरी वस्ती येथील शेतकरी, नागरिक तसेच शेतात राबणारी जनावरे यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जात होता.

सद्यस्थितीला उन्हाळ्याचे दिवस असल्याने या हातपंपाचे महत्त्व आणखीनच वाढले होते. मात्र, ऐन उन्हाळ्यातच हा पाण्याचा मुख्य स्रोत बुजवला गेल्याने या सर्व वस्त्यांवरील नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर अत्यंत गंभीर बनला आहे.
पारनेर-जामगाव रस्त्याचे डांबरीकरण आणि रुंदीकरणाचे काम सुरू असताना, खडी व मातीचे ढीग या हातपंपावर टाकण्यात येत होते. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील जागरूक नागरिक बापूसाहेब कुलट आणि इतर ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी बोलावून ही बाब निदर्शनास आणून दिली होती. त्यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी ‌’हातपंपावरील खडी आणि माती तात्काळ काढून हातपंप पूर्ववत करून दिला जाईल‌’, असे तोंडी आश्वासन ग्रामस्थांना दिले होते.

उन्हाळ्याच्या तीव्र झळा बसत असताना, हक्काचा पाण्याचा स्रोत बंद झाल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. संबंधित ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या परिसरातील नागरिकांची निकड लक्षात घेऊन संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी तात्काळ या प्रकरणात लक्ष घालावे आणि तो हातपंप तत्काळ स्वच्छ करून पूर्वस्थितीत आणून द्यावा, अशी आग्रही मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा, हक्काच्या पाण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही मते वस्ती, कुलट वस्ती व इतर परिसरातील संतप्त नागरिकांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा :  शेवगावात अतिक्रमण कारवाईविरोधात टपरीधारकांचे उपोषण... अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ