- जाहिरात -spot_img
breaking news

तब्बल ८ लाख भाविकांनी घेतले शनि दर्शन

 


शनी जयंती,शनि अमावस्यानिमित्त शनिशिंगणापूरात भाविकांचा महासागर;

१३ वर्षांनंतर दुर्मिळ योग, प्रशासनाचे चोख नियोजन. वाहतुकीचा उडाला फज्जा..

शनिशिंगणापूर–

शनि जयंती आणि शनि अमावस्या एकत्र येण्याचा दुर्मिळ योग तब्बल १३ वर्षांनंतर जुळून आल्याने शनिशिंगणापूर येथे शनिभक्तांचा महासागर उसळला. सुमारे ८ लाख भाविकांनी शनिदेवाचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे, शनेश्वर देवस्थान ट्रस्ट बरखास्त झाल्यानंतर तब्बल ६३ वर्षांनंतर प्रथमच शासन पातळीवर शनि जयंती यात्रेचे नियोजन करण्यात आले.

शनिवारी सकाळी ५ वाजून ११ मिनिटांनी शनि अमावस्येला प्रारंभ झाल्याने शुक्रवारी मध्यरात्रीनंतरच भाविकांनी शनिशिंगणापूरकडे धाव घेतली होती. पहाटेपासून मंदिर परिसर, दर्शन रांगा आणि प्रमुख मार्गांवर मोठी गर्दी झाली होती. पहाटे ४.३० वाजता संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, श्रीनाथ भिमाले व पंकज पटेल यांच्या हस्ते प्रांत आरती पार पडली.

दुपारची आरती राकेश कुमार, सौरभ बोरा, सौरभ गाडगीळ व कावडधारकांच्या हस्ते, तर सायंकाळची आरती पद्मश्री व झिम्बाब्वेचे उद्योगपती जयेश शहा यांच्या हस्ते करण्यात आली. दिवसभरात नांदेडचे आमदार आनंदराव पाटील भोंढारकर, संगमनेरचे आमदार अमोल खताळ, विठ्ठलराव लंघे, खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्यासह विविध मान्यवरांनी शनि दर्शन घेतले.

शनि जयंतीनिमित्त शनिशिंगणापूर येथील युवकांनी काशी व प्रवरासंगम येथून कावडीतून आणलेले पवित्र जल शनि चौथऱ्यावर अर्पण केले. तसेच झिम्बाब्वेचे उद्योगपती जयेश शहा व मुंबईतील व्यापारी सोनी  यांच्या पुढाकारातून विश्वशांती यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते.

यात्रेच्या काळात अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्वतः दिवसभर मंदिर परिसरात उपस्थित राहून सुरक्षा व दर्शन व्यवस्थेवर लक्ष ठेवले. विशेष म्हणजे त्यांनी मंदिर परिसरात पडलेला कचरा स्वतः उचलून स्वच्छतेचाही संदेश दिला. अहिल्यानगर पोलीस दल, सोनई व शनिशिंगणापूर पोलीसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.

देवस्थानचे कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांनी यात्रेचे नियोजन प्रभावीपणे हाताळले. वाढत्या उन्हाचा त्रास टाळण्यासाठी मंदिर परिसरात तुषार कारंजे सुरू करण्यात आले, ज्यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला.

हे सुद्धा वाचा :  रेशन दुकानातील गहू , तांदुळावर चोरट्यांचा डल्ला .... राहुरीतील घटना

यंदा भोजनालय बंद असतानाही भाविकांना अडचण भासू नये म्हणून हरियाणा, शिरसा आणि दिल्ली येथील शनिभक्तांनी अन्नदान सेवा सुरू ठेवली. पिण्याचे पाणी, चहा, सरबत, नाश्ता आणि भोजनाची मोफत व्यवस्था करण्यात आली होती.

याशिवाय देवस्थान प्रशासनाने प्रथमच खाजगी जमीन मालकांशी समन्वय साधून मोफत पिण्याच्या पाण्याची सुविधा, विश्रांती कक्ष आणि वाहनतळाची व्यवस्था उभारली होती. सोनई प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य पथक दिवसभर भाविकांच्या सेवेसाठी सज्ज होते.उन्हाचा वाढता पारा असुनही भाविकांनी शनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

जनसंपर्क कार्यालयात दिवसभर येणाऱ्या भाविकांचे स्वागत जनसंपर्क अधिकारी अनिल दरंदले व पोलीस पाटील सयाराम बानकर यांनी केले.

सात किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी

अहील्यानगर घोडेगाव रस्त्यावर मात्र सहा ते सात किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. देवस्थान ने नियोजित केलेल्या वाहन तळापर्यंत जाण्यासाठी भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

यात्रेदरम्यान दोन किरकोळ घटना

भुयारी दर्शन मार्गात पुणे येथील शनिभक्त अतुल धोत्रे यांना उन्हामुळे चक्कर आल्याने प्रशासनाने तातडीने उपचार केंद्रात दाखल केले. तसेच देवस्थानचे माजी कोषाध्यक्ष दिपक दरंदले यांना लटकूच्या मोटारसायकलची धडक बसल्याने पुढील उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात आले.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ