महावितरणच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
शेवगाव | नगर सह्याद्री
तालुक्यातील घोटण येथे शेवगाव-पैठण मार्गावर शनिवारी सकाळी वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन छेडले. सुमारे दोन तास चाललेल्या या आंदोलनानंतर महावितरणकडून लेखी आश्वासन मिळाल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून शेतीपंपांसाठी केवळ सहा तास वीजपुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. अपुऱ्या वीजपुरवठ्यामुळे ऊस पिकांना पाणी देता येत नसून, धरण पट्ट्यातील अनेक भागांत उसाची पिके जळू लागल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर घोटण येथे रास्ता रोको करत शेतकऱ्यांनी सरकार व वीज वितरण कंपनीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
आंदोलनस्थळी महावितरणचे ग्रामीण कनिष्ठ उपअभियंता विश्वास नरके, मंगेश गांगुर्डे आणि मिलिंद भामरे यांनी धाव घेत शेतकऱ्यांची भेट घेतली. येत्या दोन दिवसांत शेतीसाठी आठ तास नियमित वीजपुरवठा करण्याचे लेखी आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर आंदोलन काही काळासाठी स्थगित करण्यात आल्याची माहिती माजी सरपंच संजय टाकळकर यांनी दिली.
यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ कोठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी निलेश म्हस्के, नितीन भताने, अर्जुन मुंढे तसेच होमगार्ड जवानांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
आंदोलनात भाऊसाहेब लवांडे, संजय टाकळकर, बाळासाहेब फटांगडे, अशोक भोसले, अंबादास भागवत, हरिभाऊ कब्बाडी, सुधीर पवार, अमोल देवढे, लक्ष्मण टाकळकर, कुंडलीत घुगे, नामदेव घुगे, रणजित घुगे, बापू शेळके, ज्ञानेश्वर कुलट, गोकुळ भागवत, रामहरी घुगे, महादेव शिंदे, तुकाराम थोरवे, भारत निकम, संभाजी क्षीरसागर, बाबासाहेब गाढे, भारत मोटकर, अनिल शेळके यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.










