संगणक अभियंता शाहरूख शेख यांच्या मेहनतीला आले यश
सचिन नन्नवरे | नगर सह्याद्री
पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील युवा संगणक अभियंता शाहरुख सादिक शेख यांनी उष्ण हवामानात ‘हरमन 99’ या सफरचंदाच्या वाणाची यशस्वी लागवड करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी लागवड केलेल्या सफरचंदाच्या झाडाला भर उन्हाळ्यात फळधारणा झाली आहे. त्यामुळे सफरचंद फक्त जम्मू-काश्मीरमध्येच येते, हा प्रचलित गैरसमज त्यांनी आपल्या प्रयोगातून दूर केला आहे.
शाहरुख शेख यांचे वडील माजी सैनिक असून, आई गृहिणी आहे. त्यांनी स्वतःआयटी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेले असून ऑक्टोबर 2015 पासून आयटी क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत. त्यांची पत्नी देखील संगणक अभियंता असून सध्या दोघेही पुणे येथे वास्तव्यास आहेत. कोरोना काळात वर्क फ्रॉम होमची संधी मिळाल्याने शाहरुख यांनी गावाकडे येत आपली शेतीची आवड जोपासून शेतामध्ये नवनवीन प्रयोग करण्याचा निर्णय घेतला.
शेतीसाठी त्यांना टाकळीमिया येथील मामाचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. शाहरुख यांनी दोन वर्षांपूर्वी राहुरी येथून ‘हरमन 99’ या सफरचंद जातीची चार रोपे आणून लागवड केली होती. विशेष म्हणजे चारही रोपे यशस्वीरित्या वाढली असून त्यांना फळधारणा झाली आहे. ‘हरमन99’ हे उष्ण व कमी थंडीच्या प्रदेशासाठी उपयुक्त असे सफरचंदाचे वाण असून हिमाचल प्रदेशातील शेतकरी हरमन शर्मा यांनी ते विकसित केले आहे. या वाणासाठी सरासरी 21 ते 24 अंश तापमान व भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असतो. इतर सफरचंदांप्रमाणे याला बर्फ किंवा अति थंडीची आवश्यकता नसते. पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या वाणाच्या लागवडीसाठी योग्य ठरते. लागवड साधारण जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान केली जाते.
एकरी 500 ते 600 रोपे लावता येतात. लागवडीनंतर 1 ते 2 वर्षांत झाडाला फळे येण्यास सुरुवात होते. फळे मध्यम ते मोठ्या आकाराची, कुरकुरीत आणि चवीला गोड असतात. उन्हाळ्यात नियमित पाणी देणे आवश्यक असून प्रति झाड सुमारे 10 किलो शेणखत देणे व माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
सफरचंदाच्या झाडाला फळ धारणा झाल्यामुळे समाधानी असून आपण योग्यरित्या संगोपन केल्यास आपल्या भागात देखील विविध फळांचे यशस्वीपणे उत्पादन घेऊ शकतो हा आत्मविश्वास वाढला असल्याचे संगणक अभियंता शाहरुख शेख यांनी सांगितले.
विविध फळझाडांचे संगोपन
दरम्यान, शाहरुख यांनी आपल्या शेतात व घराजवळ केवळ सफरचंदच नव्हे तर 15 प्रकारच्या आंब्यांसह जांभूळ (3 प्रकार), पेरू (2 प्रकार), बोर (2 प्रकार), अंजीर, चिकू, नारळ, सीताफळ, ड्रॅगन फ्रूट, लिंबू, केळी, चिंच, विलायती चिंच, संत्रा व मोसंबी अशी विविध फळझाडे लावून समृद्ध फळबाग उभी केली आहे. शेताजवळील फार्महाऊस परिसरातही त्यांनी विविध फळे व फुलझाडांचे नियोजनबद्ध संगोपन केले आहे.
सफरचंदाला फळ लागल्याचे पाहून आनंद
सैन्यदलात कार्यरत असताना सफरचंदांची झाडे फक्त जम्मू-काश्मीरमध्ये बघायला मिळायची. परंतु मुलाने शेतीत वेगळा प्रयोग करून सफरचंदासारखे पीक आपल्या भागात देखील घेणे शक्य आहे, हे सिद्ध केले. त्यामुळे अनेक वर्षानंतर फळ धारणा झालेले सफरचंदाचे झाड आपल्याच घरी पाहून आनंद होतो.
– सादिक शेख, माजी सैनिक
परदेशातील नोकरीची संधी डावलली
विशेष म्हणजे, परदेशात नोकरीची संधी मिळूनही शाहरुख यांनी ती नाकारली. स्वदेशात राहूनच करिअर करत शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नवनवीन प्रयोग करण्याचा त्यांचा मानस आहे. निवृत्तीनंतर पूर्णवेळ शेतीकडे वळण्याचाही त्यांचा विचार आहे.त्यांच्या या प्रयोगामुळे स्थानिक शेतकऱ्यांसाठी नवा मार्ग खुला झाला असून कृषी विभागाने याबाबत सखोल संशोधन करून अशा वाणांचा प्रसार करण्याची गरज व्यक्त होत आहे.










